सांगली : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकरिता स्वराज्य रक्षक संभाजी फेम खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची जाहीर सभा होणार आहे. बुधवारी २४ रोजी सायंकाळी ७ वाजता विश्रामबाग गणपती मंदिर समोर ही जाहीर सभा होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रवादीचे नेते ॲड. अमित शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले की, पालक मंत्री नामदार जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासाठी सांगलीतील 260 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या मध्ये सांगली मिरज कुपवाड शहर व ग्रामीण भागातील मिळून २६० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. सर्वोत्कृष्ट किल्यास रक्कम रुपये २१,०००/- चे बक्षीस, खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक ११,०००/-, द्वितीय क्रमांक ७,०००/- व तृतीय क्रमांक ५,००० तसेच लहान गट आणि उत्तेजनार्थ अशी एक लाख रुपये किमतीची बक्षिसे स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. सहभागी किल्ला स्पर्धा मंडळातील सर्व सदस्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. किल्ला बनवणाऱ्या प्रत्येक मुलाचा सन्मान राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच किल्ला स्पर्धांना इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसे दिली जाणार असल्यामुळे स्पर्धकामध्ये देखील प्रचंड उत्साह पहायला मिळाला. त्यामुळे ही स्पर्धा सांगलीच्या इतिहासातील सर्वांत मोठी किल्ला स्पर्धा ठरली आहे.
या स्पर्धेत अनेक मंडळे, संघटना, वैयक्तिक स्पर्धक तसेच मुलींचा सहभाग लक्षणीय आहे. ४ वर्षे वयापासून ते ६५ वयापर्यंत स्पर्धक सहभागी आहेत. सर्व किल्यांचे परीक्षण पूर्ण झाले असून या स्पर्धांचे बक्षिस वितरण राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे व राष्ट्रवादीचे युवा नेते प्रतिक जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच याप्रसंगी डॉ. अमोल कोल्हे जाहीर सभेच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. यावेळी ऐतिहासिक पोवाड्यांचे सादरीकरण केले जाणार आहे असे ॲड. अमित शिंदे यांनी केले सांगितले. स्पर्धेसाठी दत्ता पाटील, आर्कि.अमित पंडित, सचिन बावचकर, विनायक यादव, अभिनंदन भोसले, प्रसाद येसाटे, निखिल साळुंखे, गणेश कदम, सागर माळी आदींनी किल्यांचे परीक्षण केले व जयंत जाधव, महालिंग हेगडे, आदित्य नाईक, अल्ताफ पटेल, संतोष शिंदे, जयंत जाधव, बापू कोळेकर आदींनी स्पर्धेचे संयोजन केले