प्रतिनिधी / सांगली
व्यापाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना व त्यांच्या कामगारांना जगणे अवघड होत आहे.त्यांना पाठिंबा म्हणून गुरुवारी सकाळी १० वा.विश्रामबाग चौकातून व्यापारी, हातगाडीवाले,हॉटेल व्यावसायिक व इतर सर्वाना बरोबर घेऊन प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाही दिली तरी मोर्चा काढला जाईल. आजच्या दिवसात निर्णय न झाल्यास शुक्रवारी आम्ही दुकाने उघडणारच असा इशारा आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिला.
आ.गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याबैठकीचा उद्देश अतुल माने यांनी विशद केला.स्वागत व प्रास्ताविक अश्रफ वांकर यांनी केले .मिरज सराफ संघटनेचे सुनील चिपलकट्टी म्हणाले,’एक्साईज च्यावेळी आम्ही ४४ दिवस बंद पाळला होता. गतवर्षी कोरोनामुळे पाडव्यासारखा मोठा सण वाया गेला होता. आताही तीच परिस्थिती आहे.ग्राहक समोर आहेत. त्यांना द्यायच्या वस्तू तयार आहेत.लॉकडाउनमुळे यावर्षीचा पाडवाही वाया जाणार आहे.असल्या परिस्थितीमुळे कामगार काम सोडून चाललेत.फळमार्केटचे अनिल आलदर यांनी आम्हाला रस्त्यावर बसून फळे विकण्याची परवानगी असेलतरच आम्ही फळमार्केट सुरु ठेवू असे सांगितले.जिम संघटनेच्या इनायत तेरदाळकर यांनीही जिमचालकांना न्याय द्यावा असे सांगितले.
सांगली रस्त्यावर उतरल्यास संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरतो हा इतिहास आहे.आमदार सुधीर गाडगीळ पुढे म्हणाले,’प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा असतो.मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याशी चर्चा करताना केवळ शनिवार व रविवारच्या बंदीबाबत चर्चा केली होती. जीआर मध्ये लॉकडाउन हा शाबाद न वापरता सर्व बंद असा शब्दप्रयोग केला आहे. वीजबिलात कोणत्याही प्रकारची माफी दिली नाही.
सूट देतो म्हणून फसवणूक केली.अनेकांची वीज तोडली आहे.यातून बाहेर पाडण्यासाठी आता रस्त्यावर उतरावेच लागेल.यामागणीसाठी गुरुवारी मोर्चा काढू.बैठक घ्यायला भाग पाडू.निर्णय न झाल्यास शुक्रवारपासून व्यापारी आपली दुकाने उघडतील असे सांगितले.दीपक माने यांनी हा विरोध सांगलीकरांचा आहे हे दाखवून द्या असे सांगितले.यावेळी अरुण दांडेकर,धीरज सूर्यवंशी,संजय यमगर.रघुनाथ सरगर,दरिबा बंडगर,सुजित राऊत,अश्रफ वांकर, अतुल माने यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.









