प्रतिनिधी / सांगली
राज्यातील सर्व एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, या मागण्यांसाठी सांगलीत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. वाढीव महागाई भत्ता फरकासह मिळावा, शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वाढीव घरभाडे भत्ता मिळावा, 3 टक्के दराने वेतन वाढीचा दर द्यावा, करारानुसार साडे बारा हजार उचल द्यावी, 15 हजार रुपये दिवाळी भेट द्यावी, तसेच दरमहा वेळेवर वेतन मिळावे या प्रमुख मागण्यासाठी संपूर्ण राज्यात एसटी कामगारांचे आजपासून बेमुदत उपोषण सुरू आहे.
सांगलीत सुरू असलेल्या उपोषणात विभागीय अध्यक्ष अशोक खोत, डी. पी. बनसोडे, युवराज शिंदे, विभागीय सचिव नारायण सूर्यवंशी,विजय चौगुले, प्रवेश हंकारे, कार्याध्यक्ष शमू मुल्ला,अशोक शिरोटे, गणपती तिडके यांच्यासह महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक,महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सदस्य सहभागी झाले आहेत.








