छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवारी झाल्या कुस्ती स्पर्धा
सांगली : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सांगली येथे सोमवार दि 9 मे रोजी कुस्त्यांच्या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरच्या सिकंदर शेख याने मारली. महान भारत केसरी सिकंदर शेख (कोल्हापूर) आणि हिंदकेसरी अमिन बिनीया (जम्मू) यांच्यात झालेल्या लढतीत सिकंदर शेखने एकचाक डावावर बिनियाला पराभवाची धूळ चारत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. त्याला मान्यवरांच्या हस्ते 2 लाखाचे पारितोषिक देण्यात आले.
कोरोनाच्या प्रभावामुळे गेली 2 वर्षे कोणत्याही स्पर्धा, मैंदाने होऊ शकली नाही. पण सध्या कोरोना काळानंतर सांगलीत पहिल्यांदाच असे मोठे कुस्ती मैदान ‘तरुण भारत’ क्रीडांगणावर भरवण्यात आले. प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुरस्कृत केली होती. याशिवाय अनेक छोट्या-मोठ्या गटातील मल्लांसह, महिला कुस्तीच्याही रंगतदार लढती यावेळी पहायला मिळाल्या.
याप्रसंगी नामदेवराव मोहिते, दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार, सुजित हांडे पाटील, अजित पाटील, उत्तमराव पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ, आदी मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ निवेदक शंकर आण्णा पुजारी, आणि जोतीराम वाजे मैदानाचे समालोचन केले.









