३० पक्षी व प्राणी नैसर्गिक अधिवसात सोडले
जखमी पक्षांना कात्रज उद्यानात सोडणार : वन अधिकाऱ्यांची माहिती
प्रतिनिधी / कुपवाड :
विविध प्रकारचे वन्य पक्षी व प्राणी अवैधरित्या घरात बाळगल्याप्रकरणी प्राणी मित्र संशयित अशोक लकडे यांची सांगलीच्या वनविभागाने कसुन चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती सहाय्यक उप वनसंरक्षक विजय गोसावी यांनी दिली.
दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी प्राणी मित्राच्या घरावर छापा टाकून ताब्यात घेतलेल्या विविध प्रकारच्या ३८ वन्य पक्षी व प्राण्यांपैकी ३० पक्षी व प्राणी दंडोबा नैसर्गिक अधिवसात सोडण्यात आले. तर प्राणीमित्राच्या घरात मृत अवस्थेत आढळलेल्या ‘घार’ या पक्षाचे नियमानुसार वन विभागाकडून दफन करण्यात आले. तसेच उर्वरीत जखमी अवस्थेत असलेल्या पक्षांना उपचारासाठी पुणे येथील कात्रज उद्यानात सोडणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
सांगलीतील एका प्राणीमित्राने विविध प्रकारचे वन्य पक्षी व प्राणी गेल्या काही वर्षापासून घरात का बाळगले होते ? त्याच्याकडे एवढी पक्षी व प्राणी कुठून आली ? प्राणी-पक्षांची तस्करी होते का? याशिवाय या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचीही सखोल चौकशी वनअधिकाऱ्यांकडून केली जात आहे. पक्षांचा राजा व शिकारी पक्षी म्हणून प्रचलित असलेला दुर्मिळ ‘गरुड’ याशिवाय घुबड, गाय बगळा, कांडे करकोच आदी पक्षी ‘त्या’ प्राणीमित्राकडे कुठून आले ? याचीही चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले. वन्यजीव पक्षी व प्राणी बाळगणे, हा गुन्हा असल्याने भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार दोषीवर कडक कारवाई होणार का ‘त्या’ प्राणी मित्राला पाठीशी घालणार? असा सवाल व्यक्त होत आहे.
सांगलीच्या वन विभागाने गुरुवारी सांगलीत विजयनगर भागात राहणाऱ्या एका प्राणी मित्राच्या घरावर छापा टाकल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या कारवाईत अधिकाऱ्यांनी प्राणी मित्राच्या घरात अवैधरित्या बाळगलेले विविध जातीचे ३८ पक्षी व प्राणी ताब्यात घेतले. बेकायदा वन्यपक्षी व प्राणी बाळगल्याप्रकरणी वन विभागाने ‘त्या’ प्राणीमित्राची कसुन चौकशी सुरु केली आहे.








