प्रतिनिधी / सांगली :
जनता कर्फ्यूनंतरही कोरोना साखळी तुटेना, रोज सरासरी हजार रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. तर सरासरी 35 ते 40 जणांचे बळी जात आहेत. कोणी बेड देता का बेड? अशी आर्त हाक रूग्णांचे नातेवाईक मारत आहेत. ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेंटर बेडसाठी सर्व दवाखान्यांचे उंबरे या रूग्णांना झिजवावे लागतात. वाढणाऱया रूग्णसंख्येचे चित्र मात्र अद्यापही बदलायला तयार नाही. रोजचा दिवस धास्तीचा अशी जिल्हय़ाची अवस्था या कोरोनाने करून ठेवली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असणारा सांगली जिल्हा आता कोरोनाचा डेंजर झोन बनला आहे.
जिल्हय़ात 18 सप्टेंबर अखेर कोरोना रूग्णसंख्या 27 हजार 691 तर उपचाराखाली रूग्णसंख्या नऊ हजार 750, तर आजपर्यंत एक हजार 38 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत. अत्यंत भयाण अवस्था जिल्हय़ाची झाली आहे. गांभीर्य नसलेली मंडळी, हाताबाहेर जात असलेली परिस्थिती आणि एकमुखी नेत्तृत्व व नियंत्रणांचा अभाव यामुळे रोज धक्क्यावर धक्के बसत चालले आहेत. जिल्हय़ाचा हॉटस्पॉट आता आणखीन हॉट बनतो की काय अशी स्फोटक स्थिती या जिल्हय़ाची बनली आहे.
जनता कर्फ्यूच्या काळातच रूग्णसंख्या वाढली
जिल्हय़ात कोरोना रूग्णसंख्या मोठय़ाप्रमाणात वाढली त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 11 सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस जनता कफ्यू जाहिर केला. पण या जनता कफ्यूमध्येच सर्वाधिक रूग्णसंख्या वाढली आहे. दहा सप्टेंबर रोजी एकूण रूग्णसंख्या ही 20 हजार 436 इतकी होती. आठच दिवसांत ती 27 हजार 691 इतकी पोहचली याचाच अर्थ या आठ दिवसांत आठ हजाराच्या आसपास रूग्ण वाढले. जनता कफ्यू असताना इतक्या मोठय़ासंख्येने रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे या जिल्हय़ात जनता कर्फ्यूचा कोणताही उपयोग झाला नसल्याचे आता स्पष्ट होत चालले आहे.
ऑक्सिजन बेडसाठी जीव टांगणीला
कोरोनामध्ये रूग्णांची प्रकृती अत्यवस्थ होते म्हणजे त्याची शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे होय. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात ही पातळी 90 इतकी असते. ती 85 इतकी खाली आली तर तातडीने उपचार करून ती वाढविता येते. तसेच जर या रूग्णांना जर कोणताही लक्षणे दिसत नसतील तरी त्यांच्या घरीच त्यांच्यावर उपचार होवू शकतात. पण 85 पेक्षा ऑक्सिजनची पातळी खाली घसरली. तर मात्र हा रूग्ण अत्यवस्थ होतो आणि त्याला तातडीने ऑक्सिजन बेडची गरज असते. त्यापेक्षाही त्याची पातळी कमी झाली तर त्याला व्हेंटिलेंटर लावला लागतो. पण, जिल्हय़ात सध्या फक्त 625 व्हेंटिलेंटर बेड आहेत. तर ऑक्सिजनचे बेड संख्या ही तितकीच आहे. पण दररोज वाढणारे रूग्ण आणि चिंताजनक रूग्ण यांचा या ऑक्सिजन आणि व्हेंटिलेंटर बेडशी कोठेही गणित जुळत नाही. हे गणित सर्व अंगाने एकदम विषम आहे. त्यामुळे या रूग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनचा बेड मिळविण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे.
कोरोनाची साखळी तुटेना
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या कोरोनाची साखळी तुटेने गरजेचे आहे. पण हीच साखळी सांगलीकरांना तोडता येईना. प्रशासनाला ही साखळी तोडण्यासाठी खंबीरपणे प्रयत्न करता येत नाहीत. तर आरोग्य यंत्रणा वाढत्या रूग्णांच्यावर उपचार करून अक्षरक्षाः दमली आहे. तर जनतेकडून सुरक्षित अंतर राखले जात नाही. मास्कचा वापर केला जात नाही. सॅनिटायझर वापरले जात नाही. त्यामुळे ही साखळी तुटेना ही साखळी तुटल्याशिवाय हा कोरोना जाणार नाही. त्यामुळे ही साखळी तुटण्यासाठी आता सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचवेळी सांगलीची कोरोनाची धास्ती कमी होईल अन्यथा सांगलीचा डेजंरस झोन आणखीनच बिघडू शकतो.








