सांगरूळ / वार्ताहर
आपल्या सहकारी व्यवसाय बंधूच्या अपघाती निधनानंतर त्याच्या मुलीच्या नावे पंधरा हजाराची ठेव पावती करून सांगरुळ व्यापारी असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. व्यापारी असोसिएशनचे सभासद सुरेंद्र कांबळे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या कुंटुंबाला आधार देण्यासाठी सांगरूळ व्यापारी असोसिएशनने मदतीचा हात दिला आहे.
काही दिवसापूर्वी कपडे इस्त्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी असोसिएशनचे सभासद सुरेंद्र कांबळे यांचे अपघाती निधन झाले . कुटुंबांमध्ये सुरेंद्र हाच एकमेव कमविता असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. पण काही महिन्यापूर्वी एका कार्यक्रमाला जात असताना सांगरुळ फाटा येथे वाहनातून उतरलेल्या सुरेंद्रला दुचाकीची ठोकर बसून ते गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारानंतरही शेवटी त्याचे निधन झाले. यामुळे सुरेंद्रचे आई – वडील व ‘अनिकेत व मानसी’ ही दोन मुले पोरकी झाली. या कुंटुंबाला आधार देण्यासाठी सांगरूळ व्यापारी असोसिएशनने मदतीचा हात पुढे केला.
सुरेंद्रची मुलगी मानसी सुरेंद्र कांबळे हिच्या नावे 15000 रुपये तिच्या शैक्षणिक खर्चासाठी ठेव पावती ठेवण्यात आली. ही ठेव पावती सांगरूळ शिक्षण संस्थचे अध्यक्ष य. ल. खाडे व सांगरूळ व्यापारी असो अध्यक्ष संभाजी नाळे यांचे हस्ते मानसीला प्रदान केली. तसेच सुरेंद्र कांबळे यांच्या दोन्ही मुलांचा इयत्ता दहावी पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च उचलण्याची जबाबदारी गावातील कोपार्डेकर कुटुंबीयांनी घेतली आहे.
सांगरुळ हे करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील बाजारपेठेचे एक मोठे गाव असून या गावात अनेक छोटे-मोठे स्थानिक व बाहेरील व्यापारी आहेत. व्यापार करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी या सर्व व्यापाऱ्यांनी सांगरूळ व्यापारी असोसिएशनची स्थापना चार-पाच वर्षापूर्वी केली आहे. व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवणे बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक स्तुत्य उपक्रम असोसिएशन मार्फत राबवले जातात.
यावेळी सांगरूळ शिक्षण संस्थेचे संचालक निवृत्ती चाबूक, बी. आर. नाळे, मुख्याध्यापक ए. ए. पवार, रामचंद्र पोतदार, उदय म्हेतर, रामकृष्ण रत्नपारखी, युवराज बाउचकर याच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थितीत होते .