सांगरूळ / वार्ताहर
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता संपन्न होणार आहे अशी माहिती सरपंच सदाशिव खाडे उपसरपंच सुशांत नाळे यांनी पत्रकार बैठकीत दिली .
यावेळी बोलताना सरपंच सदाशिव खाडे यांनी ग्रामपंचायतीचा कारभार करताना ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दिलेल्या वचननाम्याची जवळजवळ ९० टक्यावर पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ग्रामपंचायत चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्याचे आश्वासन आम्ही वचननाम्यात दिले होते. त्याची पूर्तता करत असताना मनस्वी आनंद होत आहे असे सांगितले. यावेळी कोरोना महामारीच्या काळात सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील माजी सैनिक व युवकांच्या सहकार्याने गावामध्ये राबवलेला लॉकडाऊनचा पॅटर्न जिल्हाभर गाजला होता. यामध्ये काम करणाऱ्या सर्व दक्षता समिती सदस्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाणार असल्याचे सरपंच श्री खाडे यांनी यावेळी सांगितले
सांगरूळ ग्रामपंचायत चौकात होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील भूषविणार असून करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर गोकुळचे संचालक अजित नरके, यशवंत बँकेचे संचालक प्रकाश देसाई पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, माजी जि. प. सदस्य बाजीनाथ खाडे, यशवंत बँकेचे माजी संचालक दिलीप खाडे व शिवाजीराव खाडे, कुंभीचे व्हा. चेअरमन निवास वातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच सदाशिव खाडे व उपसरपंच सुशांत नाळे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.
या पत्रकार बैठकीला कुंभी कासारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन निवास वातकर यशवंत बँकेचे माजी संचालक दिलीप खाडे ग्रामपंचायत सदस्य सरदार खाडे दत्तात्रय सुतार आनंदा इंगळे अनिल घराळ ग्रामसेवक पी एम बिडकर यांचेसह ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. आभार उपसरपंच सुशांत नाळे यांनी मानले.