सांगरुळ येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण; सांगरूळसाठी सौर ऊर्जा प्रकल्प देण्याची केली घोषणा
सांगरूळ / वार्ताहर
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य एवढे अतुलनीय होते. त्यांच्या कार्याचा गौरव सातासमुद्रापार होत आहे तसेच त्यांच्या राजनीतीचा वापर जगभरातील देश स्वतःच्या देशाच्या विकासासाठी करत आहे. कोणा एका पक्षाला पुरते किंवा जातीपुरते मर्यादित आहे त्यांचे नव्हते .त्यांच्या नावाचा वापर करून राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून जनहिताचा राजकारभार करण्याची गरज आहे .असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. सांगरूळ ( ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगरूळ ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत निधीतून केलेली विकास कामे कौतुकास्पद असून गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी आवश्यक असणारी वीजनिर्मिती होईल एवढ्या क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प ग्रामपंचायतीस देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आणि राजनीती बरोबरच स्वराज्यस्थापनेचे कार्य अलौकिक आहे. त्यांना नियमित वंदन करावे इतके त्यांचे कार्य अतुलनीय आहे. गावाच्या मुख्य चौकातील त्यांचा पुतळा युवकांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. गावासाठी चाळीस लाखावर निधी दिला असून यापुढेही गरजेनुसार निधी देण्याची ग्वाही आमदार आसगावकर यांनी यावेळी दिली. विकासाची दृष्टी असणाऱ्या एका गावाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटत असल्याचे आमदार आसगावकर यांनी यावेळी सांगितले.
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगरूळ ग्रामपंचायतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून विकास केला असून गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सुलभ जलसुविधा योजनेतून निधी मंजूर करून देण्याची ग्वाही दिली. सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक करताना लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाचा आढावा घेतला व उर्वरित अपूर्ण विकास कामासाठी निधी देण्याची मागणी केली.
गोकुळचे संचालक अजित नरके यशवंत बँकेचे संचालक प्रकाश देसाई कुंभीचे व्हा. चेअरमन निवास वातकर ,पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी माजी जि प सदस्य बाजीनाथ खाडे,यशवंत बँकेचे माजी संचालक दिलीप खाडे व शिवाजीराव खाडे , प्रकाश आसगावकर सांगरुळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष के.ना. जाधव उपसरपंच सुशांत नाळे यांचे सह कुंभीचे संचालक यशवंत मंचचे सदस्य ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.बी. गोंधळी यांनी केले आभार माजी सरपंच शशिकांत म्हेत्तर यांनी मानले.