सांखळी /प्रतिनिधी
सांखळी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 9 साठी शनिवारी झालेल्या मतदानात एकूण 584 मतदारांपैकी 512 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना असून दशरथ आजगावकर आणि राजेंद्र आमेसकर हे दोघे आमनेसामने आहेत.
सांखळी नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 9 मधील ही निवडणूक यंदा अटीतटीची झाली असल्याचे बोलले जाते. मागील निवडणुकीत या जागेवर दामोदर घाडी हे 247 मते मिळून विजयी झाले होते. दामोदर घाडी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्याने येथे पुन्हा निवडणूक घेण्यात आली.
सांखळी पालिकेच्या प्रभाग 9 मध्ये जो उमेदवार निवडून येईल तो पालिकेवर कोणाची सत्ता राहाणार हे ठरवणार असल्याने ही पोटनिवडणूक खूप अटीतटीची झाली आहे.
मतदानाच्यावेळी भाजप समर्थक नगराध्यक्ष यशवंत माडकर, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, रेशमी देसाई, राधिका सतोस्कर, विजय कुमार वरेकर इत्यादी मतदान केंद्रातील घाडामोडींकडे लक्ष देऊन होते तर प्रवीण ब्लेगन, धर्मेश सग्लानी, महादेव खांडेकर नीलकंठ गावस रियाज खान, राया पार्सेकर, कुंदा माडकर, ज्योती ब्लेगन, अंशीरा खान इत्यादी काँग्रेस समर्थकही निवडणूक प्रक्रिया जावळ राहून पाहत होते.









