शुक्रवारी भर पावसातही सुरु होती वाहतूक
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली ते साखळी मुख्य रस्त्यावरून भर पावसातही राजरोसपणे होत असलेल्या खनिज वाहतुकीमुळे या रस्त्यावर होणाऱया चिखलामुळे संतप्त बनलेल्या साखळीतील नागरिकांनी शुक्रवारी खनिजवाहू ट्रक अडविले. या प्रकारानंतर डिचोली पोलीस निरीक्षकांनी वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला. पाऊस पडल्यास खनिज वाहतूक करणार नाही, या हमीवर अडविण्यात आलेले ट्रक सोडण्यात आले.
शिरगाव येथील एका खाणीवरील खनिजमालाची उचल कंत्राटदारामार्फत आमोणा येथे करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही वाहतूक सुरू असून त्याकडे सामान्य नागरिकांनीही कानाडोळा केला होता. सध्या राज्यातील खाणव्याप्त भागातील लोकांची तसेच विशेषतः ट्रकवाल्यांची बिकट परिस्थिती पाहता त्यांना या खनिजमालाच्या वाहतुकीद्वारे काही प्रमाणात मिळकत मिळावी या उद्देशाने त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते.
चिखलामुळे दुचाकीचालक पडले
मात्र काल शुक्रवारी 10 जुलै रोजी पाऊस सुरू असतानाच खनिजमालाचे ट्रक डिचोली साखळीतून धावू लागले. आतील खनिजमिश्रीत पाणी रस्त्यांवर सांडत असल्याने संपूर्ण रस्ता लाल झाला. रस्त्यावर चिखल साचून बारिक पाऊस आल्यानंतर साखळीत दोन दुचाकीचालकही पडले. त्यामुळे संतप्त बनलेल्या साखळीचे माजी सरपंच प्रवीण ब्लेगन यांनी गोकुळवाडी साखळी येथील आपल्या घराजवळच लाडजी टॉवर या इमारतीसमोर रस्त्यावर खनिजमालाचे ट्रक अडविले. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूने ट्रकांची मोठी रांग निर्माण झाली. ट्रकांमधील खनिजमिश्रीत चिखलमय पाणी संपूर्ण रस्त्यावर सांडले गेले. रस्त्याला खाण भागातील रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी नगरसेवक राया पार्सेकर, माजी नगरसेवक रियाझ खान, आनंद वेरेकर व इतरांची उपस्थिती होती.
लोकांना त्रास करून वाहतूक नको : प्रवीण ब्लेगन
ट्रकवाल्यांना काहीतरी आर्थिक आधार मिळत असल्याने आम्ही गप्पच होतो. मात्र सध्या पावसाचा जोर सुरू असतानाच रस्त्यावर खनिजमिश्रीत चिखलाचे पाणी सांडत सर्रासपणे होणाऱया वाहतुकीचा लोकांना आणि वाहनचालकांना त्रास होऊ लागला आहे. काहीजण दुचाक्मया घेऊन पडले. काहीजणांच्या अंगावर, गाडय़ांवर ट्रकांच्या बकेटमधून मागच्या बाजूने पडणारा चिखल, पाणी सांडले. त्यामुळे विनाकारण सामान्य लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. यासाठीच सदर ट्रक अडविण्यात आले आहेत, असे सांखळीचे माजी सरपंच प्रवीण ब्लेगन यांनी सांगितले.
आमचा रोष ट्रकवाल्यांवर नसून सरकारवर
आमचा रोष ट्रकवाल्यांवर नसून सरकारवर आहे. जोरदार पाऊस असतानाही सरकारने राज्यातील खनिज वाहतूक मुख्य रस्त्यांवरून सुरू ठेवली आहे. मात्र त्याचे सामान्य जनतेला काय परिणाम भोगावे लागत आहेत, याचे काहीच पडून गेलेले नाही, असेही ब्लेगन यांनी सांगितले.
साखळी येथे ट्रक अडविण्यात आल्यानंतर साखळी आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची माहिती आपल्या वरि÷ अधिकाऱयांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी सदर वाहतूक बंद करण्याची सूचना कंत्राटदाराला केली. त्यामुळे वाहतूक बंद झाली. घटनास्थळी आलेल्या पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्याशी प्रवीण ब्लेगन व इतरांनी चर्चा करताना पाऊस सुरू असताना खनिज वाहतूक करू नये, या हमीवर अडविण्यात आलेले ट्रक सोडण्यात आले.
प्रथमच पावसाळय़ातही रस्त्यावरून खनिज वाहतूक : सावंत गोवा राज्याच्या झतिहासात प्रथमच सरकारतर्फे पावसाळय़ातही मुख्य रस्त्यावरून खनिज वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात या खनिज वाहतुकीचा सामान्य लोकांना त्रास होईपर्यंत मुख्यमंत्री गप्प का आहेत हे एक कोडेच आहे. सरकार सध्या आपल्या स्वार्थासाठी खनिज वाहतूक करीत आहे. जनतेचे त्यांना पडून गेलेले नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते खेमलो सावंत यांनी व्यक्त केली.









