वार्ताहर / झुआरीनगर

सांकवाळ येथील एका घरात आग लागण्याची घटना गुरूवारी संध्याकाळी घडली. या घटनेत लाखभराची नुकसानी झाली. तर पाच लाखांची मालमत्ता वाचवण्यास अग्नीशामक दलाला यश आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे आगली असण्याची शक्यता आहे.
उपलब्ध माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सांकवाळ येथील शिवदास नाईक यांच्या घरात ही आग लागली. वॉशिंग मशिनमध्ये शॉटसर्किट होऊन ही आग घरात पसरली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आग लागल्याचे समजताच पाण्याचा मारा करून ही आग विझवीण्याचा प्रयत्न या घरातील लोकांनी केला. परंतु लगेच ही आग पूर्ण स्वयंपाकघरात पसरली व घरातील इतर सामानालाही आग लागली.
घटनेची माहिती मिळताच वास्कोतील अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खिडकीतून बंबाद्वारे आग नियंत्रणात आणली. या आगीत वॉशिंग मशिन जळून खाक झाले. तसेच घरातील फ्रीज, एसी व इतर वीजेची उपकरणेही जळाली. यावेळी घरात गॅस सिलिंडर होते. सुदैवाने तीथपर्यंत आग पोहोचली नाही. अग्नीशामक दला वेळीच ते सिलिंडर बाहेर काढले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या आगीत घरातील बरेच सामान जळाले व इतर वस्तूंची नुकसानी झालेली आहे. या घटनेत लाखभराचे नुकसान झाले. तर पाच लाखांची मालमत्ता वाचवण्यास अग्नीशामक दलाला यश आले. वास्को अग्नीशामक दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूनाथ भट, अमृत मिराशी, प्रमोद नाईक, पुरूषोत्तम कवळेकर, सेड्रीक कुलासो यांनी अथक परिश्रम घेऊन आग विझविली.









