बेळगावची अनुष्का आपटे साकारणार ‘शारदा’
प्रतिनिधी / बेळगाव
सहय़ाद्री वाहिनीवरून दि. 19 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वा. ‘संगीत शारदा’ हे नाटक प्रसारित होणार आहे. या नाटकामध्ये शारदेची मध्यवर्ती भूमिका बेळगावच्या अनुष्का आपटे हिने केली आहे. नाटकाचे पुनर्प्रसारण शनिवार दि. 20 रोजी दुपारी 1.30 वा. व रात्री 10.30 वा. आणि सोमवार दि. 22 रोजी पहाटे 1.30 वा. होणार आहे. या नाटकाचे चित्रण मुंबई येथे झाले आहे.
अनुष्काने भरतनाटय़ मंदिर पुणे आयोजित नाटय़गीत स्पर्धेत 2017 मध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. त्याचवेळी संगीत शारदाचे दिग्दर्शक रविंद्र खरे यांनी तिला नाटकात काम करशील का? अशी विचारणा केली होती. पुढे तिने या संघाबरोबर या नाटकाचे 4 प्रयोग केले.
यापूर्वी बेळगावच्या रंगभूमी संस्थेच्या संचालिका मेधा मराठे यांच्या दिग्दर्शनाखाली तिने ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’ व ‘संगीत स्वयंवर’ या नाटकात प्रमुख भूमिका केल्या. बेळगावला झालेल्या मराठी नाटय़ संमेलनामध्ये तिने संगीत सौभद्रमध्ये सुभदेची भूमिका रंगविली होती. रंगभूमी ग्रुपचे हुबळी, पुणे, गोवा, सोलापूर, सावंतवाडी, बेंगळूर या ठिकाणी यशस्वी प्रयोग झाले आहेत. गायनाची आवड असल्याने व गायन शिकत असल्याने ती नाटय़गीते सहज गाऊ शकते. सध्या मंजुश्री खोत व श्रीधर कुलकर्णी यांच्याकडे ती शिक्षण घेत आहे.
अभिनयाची तिला आवड असून, सध्या पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ललित कला केंद्र या संस्थेत बी. ए. थिएटरची प्रवेश परीक्षा तिने दिली. 76 विद्यार्थ्यांमध्ये ती प्रथम आली.









