दहा वर्षातील तिसरी घटना; पर्यावरणप्रेमी सुखावले
प्रतिनिधी / कराड
सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पात बुधवारी वन विभागाने लावलेल्या एका कॅमेरा ट्रपमध्ये पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले आहे. यामुळे सहय़ाद्रि प्रकल्पातील वाघाचा अधिवास स्पष्ट झाला असून पर्यावरणप्रेमी सुखावले आहेत. विशेष म्हणजे हा वाघ शिकारीसह कॅमेऱयात टिपला गेला असून प्रकल्पातील समृद्धतेचे हे लक्षण मानले जात आहे. सहय़ाद्रिमधील एका ’संवर्धन राखीव वनक्षेत्रा’मध्ये (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) वाघाचे दर्शन घडले आहे.
कॅमेरा ट्रपमध्ये बुधवारी रात्री या वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले. सह्याद्रीमधील वनक्षेत्रांना ’कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’चा दर्जा दिल्यानंतर प्रथमच या भागामध्ये वाघाच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा मिळाला आहे. ज्यामुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे. तथापि वन्यजीव विभागाने वाघाचा नेमका ठावठिकाणा घोषित केलेला नाही.
गेल्यावर्षी राज्य सरकारने सह्याद्रीमधील आठ वनक्षेत्रांना ’कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’चे संरक्षण दिले होते. यामध्ये साताऱयातील जोर-जांभळी (6,511 हे), कोल्हापूरमधील विशालगड (9,324 हे), पन्हाळा (7,291 हे), गगनबावडा (10,548 हे), आजरा-भुदरगड (24,663 हे), चंदगड (22,523 हे) आणि सिंधुदुर्गमधील आंबोली-दोडामार्ग (5,692 हे) आणि तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा समावेश आहे. याची अधिसूचना काही महिन्यांपूर्वी निघाली होती. या वनपट्टय़ांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्रीमधील वन्यजीव आणि खास करुन वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित होणार असल्याचे म्हटले जात होते. आता त्यासंबंधीचा पुरावा हाती लागला आहे. वन विभागाने संरक्षित केलेल्या या आठ ’कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’पैकी एका वनक्षेत्रामध्ये वाघाचा वावर आढळून आला आहे.
2010 साली सहय़ाद्रि व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली होती. त्यानंतर व्याघ्र संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले होते. दरम्यान, दरवर्षीच्या पाहणीत वाघ दिसण्याच्या घटना कमी प्रमाणात होत्या. वाघाच्या वावराची माहिती मिळाल्यानंतर वन कर्मचायांनी एका ’कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये कॅमेरा ट्रप लावले होते. या कॅमेरा ट्रपमध्ये बुधवारी रात्री नर वाघाचे छायाचित्र आल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही बेन क्लेमंट यांनी माहिती दिली. वाघाचे छायाचित्र हे त्याने केलेल्या शिकारीबरोबर टिपले गेल्याचे त्यांनी सांगितले.
वाघाच्या सुरक्षित अधिवासाच्या दृष्टीने नेमक्या जागेबद्दल सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे सह्याद्रीत आठ ’कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’च्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जाऊन त्याठिकाणी वाघांचा संचार सुरू असल्याचे उघड झाल्याचे, बेन म्हणाले.
दहा वर्षात तिसऱयांदा वाघाचे छायाचित्र मिळाले
याबाबत माहिती देताना मानद वन्य जीव रक्षक रोहन भाटे म्हणाले की, व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर 2012 साली कॅमेरा ट्रपमध्ये वाघाचे छायाचित्र मिळाले होते. त्यानंतर काही वर्षे वाघाने दर्शन दिले नव्हते. 26 जून 2018 साली पुन्हा वाघाचे छायाचित्र मिळाले होते. आता तिसऱयांदा वाघाची छबी कॅमेरात आली आहे.
सहय़ाद्रितील पर्यावरण समृद्ध
शासनाने सहय़ाद्रिमधील आठ वनक्षेत्रात राखीव संवर्धनचा दर्जा दिला आहे. यामुळे वाघांचा भ्रमणमार्ग सुलभ झाला आहे. त्यामुळेच हे छायाचित्र मिळाले आहे. शिकारीसह वाघाचे छायाचित्र उपलब्ध झाल्याने प्रकल्पात वाघांना भरपूर प्रमाणात खाद्य, तृणभक्षी प्राणी असल्याचे दिसत आहे. हे सहय़ाद्रितील पर्यावरण समृद्ध असल्याचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया मानद वन्य जीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली.









