मनोहर सप्रे / देवरूख
सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेल्या मारळ नगरीत बुधवारी दुपारच्या मुहुर्तावर “आली लग्न घटी समीप नवरा’’ चे सुर उमटले आणि हजारो भाविकांनी मंत्राक्षता टाकत साक्षात परमेश्वराचेच लग्न लावण्याचा योग साधला. शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्वरचा विवाह सनई चौघडय़ाच्या सुरात आणि मंगलाष्टका मंत्रोपचारांच्या मंगलमय वातावरणात कोंडगावची वधू देवी गिरिजा हिच्याबरोबर थाटामाटात संपन्न झाला. देवांचे लग्न याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी सह्याद्रीच्या कपारीत उपस्थित राहून मकरसंक्रांतीचा अपूर्व योग साधला.
आंगवली येथील मुळ मठात विवाहापूर्वीच सर्व विधी झाल्यावर मंगळवारी रात्री विडा भरण्यासह महाप्रसाद, नवस बोलणे, नवस फेडणे असे विधी उरकून श्री देव मार्लेश्वरची मुर्ती चांदीचा टोप प्रथेप्रमाणे सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आला. याचबरोबर गंगामाता आणि मल्लीकार्जुनाची मुर्तीही पालखीत स्थानापन्न झाली. तत्पूर्वी आंबवची दिंडी, वांझोळेची कावड, लांजाची दिंडी यांचे आगमन झाले. सायंकाळी विवाहसोहळ्याचे यजमानी वाडेश्वर देवाची पालखी आदींचे मानकरी व भाविकांसह आंगवली मठात आगमन झाले. मध्यरात्री 12 वाजता ‘हर हर मार्लेश्वर’चा जयघोष करीत हा सारा लवाजमा मार्लेश्वर शिखराकडे निघाला. ढोल, ताशे, गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देव मार्लेश्वरची पालखी मार्गस्थ झाली.
सहय़ाद्री दुमदुमला
पालखी वाहण्याचा मान प्रथेप्रमाणे भोई समाजाचा होता तर सोबत मशालजी म्हणून चर्मकार बंधू, मारळचे सुतार, अबदागिर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी, न्हावी बंधू याचप्रमाणे मानकरी आंगवलीचे अणेराव बंधू आदींसह हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते. शिखराच्या पायथ्याजवळ पवईच्या पायरीवर सारा लवाजमा आणि साखरप्याहून आलेल्या वधू गिरीजादेवीची पालखी उत्तररात्रीनंतर एकत्र आल्यावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने सारा सह्याद्री दुमदुमून गेला. शिखरावर पोचल्यावर तीनही पालख्यांचे प्रथेप्रमाणे पारंपरिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर तीनही पालख्या नियोजित ठिकाणी वस्तीला गेल्या. सोबत मानकरीही होतेच.
आज पहाटे मुलीचे घर पाहणे, मागणी टाकणे, मुलाचे घर पाहणे, पसंती, ठरावनामा, कल्याणविधीची वेळ ठरवणे असे विधी झाले. दुपारी 12 नंतर विवाहासाठी 360 मानकऱयांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर सुयोग्य मुहुर्त साधत श्री देव मार्लेश्वर आणि गिरीजादेवीचे लग्न लावण्यात आले.
यासाठी आधीच हिंदू धर्मातील लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली होती. यावेळी करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे होता. रायपाटण, लांजा, मार्लेश्वरचे मानकरी व विश्वस्त यांच्या पौरोहित्याखाली हा विवाह सोहळा मोठय़ा थाटामाटात पार पडला. तदैंव लग्नम… चे सुर मंडपात उमटले आणि सर्व भाविकांनी परमेश्वराचे लग्न लावण्याचा अपूर्व योग साधला. विवाहानंतर उपस्थित भाविकांनी देवाला जानवी अर्पण केली त्याचप्रमाणे नवीन प्रथेप्रमाणे नवरा, नवरीला आहेर देण्यात आला. यावेळी सौभाग्यवतींनी करंबेळीच्या डोहात फुले, पानाचा विडा, सुपारी, बांगडय़ा, हळद, पिंजर असे सामान असलेली परडी अर्पण केली. त्यानंतर नवविवाहितांच्या मुर्त्या सर्व विधी झाल्यावर मार्लेश्वराच्या गुहेत ठेवण्यात आल्या. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमही झाला.
प्रशासनाचे चोख नियोजन
बुधवारी यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन संपूर्ण मारळ परिसरासह मार्लेश्वर पायथा ते शिखर, धारेश्वर धबधबा आणि करंबेळीचा डोह आदी भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य परिवहन महामंडळाने पार्किंगपासून थेट पायथ्यापर्यंत जाणारी विशेष बससेवाही सुरू केली होती. याचप्रमाणे देवरूख, संगमेश्वर, साखरपा, माखजन, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, दापोली अशा आगारातून महामंडळाच्या जादा फेऱयाही हजारो प्रवाशांना घेऊन मारळनगरीत दाखल झाल्या होत्या. यात्रोत्सवाच्या ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्थांनी खिचडी प्रसाद, मोफत सरबत, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा असे उपक्रम राबविले. आजच्या यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज संपूर्ण दिवस तीनही पालख्यांचे वास्तव्य मार्लेश्वर शिखरावर राहणार असून उद्या सर्व पालख्या व मानकरी पायथ्याकडे येण्यास निघणार आहेत.









