मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत झालेले लसीकरण महामारीच्या फाटलेल्या आकाशाला ठिगळ लावण्याप्रमाणे आहे. तरीही मुंबई पालिकेचे लसीकरणासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणात अव्वल राहणाऱया राज्यात लसीकरणाआड अनेक अडथळे आले. त्यामुळे लसीकरणात गाठलेला टप्प्याबाबत ‘हे ही नसे थोडके’ असे नाईलाजाने म्हणावे लागेल.
मुंबई आर्थिक राजधानी असे सराईतपणे आपण सर्वच बोलून जातो. मात्र त्याच मुंबईवर एखादे अरिष्ट कोसळल्यावर पुन्हा उभे राहण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जातात का किंवा प्रयत्न केले गेले तरी त्यातील अडसरांचा विचार अंमलबजावणी करताना होतो का यावर सांशकता निर्माण करण्याची वेळ सध्याची लसीकरण आकडेवारी पाहून आली आहे. मुंबईत 18 वर्षावरील लसीकरण 60 टक्क्याहून अधिक झाले असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. ही संख्या मोठी असली तरी गेल्या 6 महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर झालेले हे लसीकरण मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने समाधानकारक नसल्याचे सामान्य नागरिकही सांगू शकेल. राज्यात लसीचा वापर पुरेपूर होत आहे. लसीकरणाला महत्त्व देऊन लस उपलब्ध झाल्याप्रमाणे लसीकरण करण्यात येत आहे, ही तेवढी या मोहिमेची जमेची बाजू आहे. एकटय़ा मुंबईत पालिकेची 293 लसीकरण केंद्रे, राज्य सरकारची 20, खासगी 113 अशा एकूण 426 लसीकरण केंद्रातून लस टोचली जात आहे. 6 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर पालिकेकडून 72,23,853 मुंबईकराना लसीकरण करण्यात आले आहे. या लसीकरणात पालिकेला अडथळेदेखील आले. तरीही उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न आजही होताना दिसत आहे. मात्र हा प्रयत्न केंद्राकडून होणाऱया लस पुरवठय़ावर अवलंबून आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 29 लाख आहे. यात 18 वर्षावरील 90 लाखाच्या घरात आहेत. एका दिवशी 1 लाख लसीकरण करता येते हेही पालिकेने करून दाखवले आहे तर मुंबईतील 227 वॉर्डात किमान एक तरी लसीकरण केंद्र आहे. लसीकरणाला आवश्यक मनुष्यबळ, लसीकरण केंद्र आदी सुविधा उपलब्ध असल्याने महिन्याला 25 लाख लस उपलब्ध झाल्यास ऑगस्ट महिन्यातील लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करता येईल असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचे म्हणणे आहे. दरम्यान उद्दिष्टाला तोकडा लस पुरवठा आणि अनुत्सुक मुंबईकर अडसर ठरत असल्याची पालिकेची खंत आहे. गेल्या शनिवारपर्यंत मिळालेल्या माहिती नुसार आरोग्य कर्मचारी आणि प्रंट लाईन वर्कर यांना मिळून 4,25,202 जणांना पहिला डोस देण्यात आला तर 2,92,829 जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच 60 वर्षावरील 9,99,459 जणांना पहिला डोस देण्यात आला तर 6,19,871 जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. हे मिळून 16,19,330 डोस देण्यात आले आहेत. 45 ते 59 वयोगटातील 14,56,869 जणांना पहिला डोस तर 7,42,758 जणांना दोन्ही डोस असे या वयोगटातील 21,99,627 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. या वर्गातील लाभार्थ्यांनंतर स्तनपान करणाऱया माता, गरोदर महिला अशा काही विशेष वर्गाला लसीकरण करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे स्तनपान करणाऱया मातांपैकी 4,168 जणींनी पहिला डोस घेतला आहे. तर 38 मातांना दोन्ही डोस देण्यात आले. अशा एकूण 4,206 स्तनपान करणाऱया मातांना लसीकरण करण्यात आले. तर 316 गरोदर महिलांना पहिला डोस व दोन गरोदर महिलांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. परदेशात शिक्षणासाठी व व्यवसायासाठी जाणाऱया तसेच ऑलिम्पिकसाठी जाणाऱया खेळाडूंनादेखील लसीकरण करण्यात आले आहे. या तिन्ही विशेष वर्गवारीतील 3,962 जणांना पहिला डोस तर 14,408 जणांना दोन्ही डोस देण्यात आले असून या गटात एकूण 17,970 लस देण्यात आली आहे. मानसिक आणि शारीरिक अपंग असणऱया 1, 388 जणांना पहिला डोस तर 133 जणांना दोन्ही डोस असे मिळून 1 हजार 521 जणांना डोस देण्यात आले आहेत. या शिवाय ओळख पत्र नसलेले, कैदी तसेच किन्नर यातील 1,172 जणांना पहिला डोस तर 24 जणांना दोन्ही डोस असे एकूण 1196 जणांना लस टोचण्यात आली आहे. असे एकंदरीत सर्व गटातील एकूण 54,52,457 जणांना पहिला डोस तर 17,71,396 जणांना दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. एकूण 72,23,853 मुंबईकरांना लस टोचण्यात आली आहे. मात्र हे लसीकरण करत असताना पालिकेला अथक प्रयत्न करावे लागले. यात कोविन ऍपच्या गोंधळापासून लस तुटवडा ते अनुत्सुक असलेले मुंबईकर या अडथळ्यांचा सामना करावा लागला. 16 जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या महिन्यात कोविड लसीकरणात प्राधान्य क्रम ठरवून आरोग्य कर्मचाऱयांना प्राथमिकता देण्यात आली. मात्र पहिल्या महिन्यात निव्वळ 1,926 आरोग्य कर्मचाऱयांनी लस टोचून घेतली. ही संख्या कमी असण्याचे कारण म्हणजे कोविन ऍपमधील गोंधळ आणि आरोग्य कर्मचाऱयांच्या मनातील लसीबाबत असलेली साशंकता हे होत. तर फेब्रुवारी महिन्यात नोंदणीतील जो काही गोंधळ सुरु झाला त्याचा मनस्ताप सगळ्या उत्सुक मुंबईकरांना सहन करावा लागला. या गोंधळाचा फटका दुसऱया डोसच्या नोंदणीत स्पष्ट दिसून आला. बहुतांश मुंबईकर लसीसाठी उत्सुक असूनदेखील नोंदणीच्या गोंधळात गुरफटून गेले होते. सकाळीच सुरू होणारी ऍप नोंदणी दुसऱया मिनिटाला फुल्ल झाल्याचे दर्शवित होती. यातून लसीसाठीची उत्सुकता कमी होत गेली. तर नोंद झालेल्या लाभार्थ्यांना दुसऱया डोसचा संदेश न जाण्याने केंद्रावर चौकशीची गर्दी वाढली होती. त्यात ऑफ लाईन घेतलेल्या डोसची नोंद ऍपवर होत नसल्याचा गोंधळ देखील वाढला होता. तर नावांची पुनरावृत्तीही होणे, नोंदणीत अडचणी येणे, दोन वेळा संदेश जाणे, ऍप बंद राहणे अशा अनेक अडचणींना सामोरे जात गेल्या 6 महिन्यात लसीकरण सुरू आहे. ऍपचा गोंधळ संपत नाही तोपर्यंत लस तुटवडय़ाची समस्या उभी राहिली होती. लस तुटवडय़ामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. तर काही वेळा फक्त दुसरा डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. यात फक्त 45 वर्षावरील किंवा फक्त 60 वर्षावरील लसीकरण राबविण्याचे कारणही लस तुटवडय़ात लपलेले आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. संभाव्य तिसऱया लाटेचा धोका जरी असला तरीदेखील नोकरदार वर्ग, व्यापारी आणि कष्टकरी घराबाहेर पडल्यास अर्थचक्र सुरळीत होऊ शकेल. हे अर्थचक्र संपूर्ण लसीकरण करण्याने कार्यान्वित होण्यास मदत होईल. लसीकरणासाठी प्रयत्न चांगले झाले. वास्तविक गेल्या 6 महिन्यात लसीकरणाचा गाठलेला टप्पा हे अडखळत मिळवलेले यश असल्याचे वाटत आहे.
राम खांदारे








