धनाढय़ कुटुंबीयांना बीपीएल कार्डे परत करण्याचे आवाहन : दंडात्मक कारवाईचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
आर्थिकदृष्टय़ा सक्षम असूनही खोटी माहिती पुरवून बीपीएल रेशनकार्ड मिळविलेले सरकारी कर्मचारी व इतर धनाढय़ असलेल्यांनी आपली रेशनकार्डे जमा करावीत, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले होते. त्याला प्रतिसाद देत गेल्या सहा महिन्यात केवळ एक हजार रेशनकार्डे परत केली आहेत.
गोरगरीब जनतेला जीवनावश्यक साहित्य रेशनद्वारे सहज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून रेशनचा पुरवठा केला जातो. मात्र, गरीब जनतेबरोबर आर्थिकदृष्टय़ा धनाढय़ असलेल्या काही कुटुंबीयांनी खोटी माहिती पुरवून बीपीएल रेशनकार्डे मिळविली आहेत. अशांनी आपली रेशनकार्डे परत करावीत, असे आवाहन खात्याने केले होते. मात्र, अद्यापही बऱयाच रेशनकार्डधारकांनी आपली रेशनकार्डे परत केली नाहीत, अशांनी 31 मार्चपर्यंत आपली रेशनकार्डे जमा करावीत, असे खात्याने कळविले आहे. अन्यथा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
आयकर भरणाऱया व शहरात 1 हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागेत घर असणाऱया, शिवाय शिक्षण, परिवहन, हेस्कॉम, रेल्वे पोलीस आदी खात्यांतील सरकारी कर्मचाऱयांनी आपली नावे वगळून कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने बीपीएल कार्डे मिळविली आहेत. त्यांनी तातडीने आपली रेशनकार्डे परत करावीत, अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात 1112 अंत्योदय रेशनकार्डे, 71 हजार 328 बीपीएल तर 68 हजार 647 एपीएल रेशनकार्डधारक आहेत. ग्रामीण भागात 5512 अंत्योदय, 36 हजार 629 बीपीएल तर 98 हजार 106 एपीएल रेशनकार्डधारक आहे. बीपीएल रेशनकार्डधारकांना 5 किलो तांदूळ, 2 किलो गहू व प्रादेशिक धान्य म्हणून ज्वारी किंवा नाचणा वितरित केला जातो. अंत्योदय कार्डधारकांना 35 किलो तांदूळ वितरित केले जातात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजाराहून अधिक असेल तर अशा कुटुंबीयांची बीपीएल रेशनकार्डे रद्द केली जात आहेत. अशा पद्धतीने मागील सहा महिन्यात 1 हजार रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत.









