प्रतिनिधी /बेळगाव :
कोरोनामुळे मागील 6 महिन्यांपासून हेस्कॉमची तक्रार निवारण बैठक बंद होती. अखेर निवडक ग्राहकांच्यासोबत 6 महिन्यांच्यानंतर शनिवारी पुन्हा तक्रार निवारण बैठक पार पडली. वीजबिलातील तफावत, नावातील बदल, मीटर दुरूस्ती यासह इतर तक्रारी या बैठकीत मांडण्यात आल्या. सर्व तक्रारींची दखल घेवून त्या काही दिवसांमध्ये दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
हेस्कॉमच्या शहर उपविभाग 2 मध्ये शनिवारी सकाळी बैठक पार पडली. सहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांच्या उपस्थितीत हा बैठक झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे हेस्कॉमकडून तक्रार निवारण बैठका रद्द करण्यात आल्या. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असून पुन्हा बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांच्या तक्रारी त्वरीत दूर व्हाव्यात, यासाठी बैठका पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये वीजबिलातील तफावतीसह इतर तक्रारी मांडण्यात आल्या. याचबरोबर मीटरच्या नावातील बदल, मीटर रीडींगच्या तक्रारी ग्राहकांनी मांडल्या. या तक्रारींची नोंद घेवून त्या दूर करण्याच्या सूचना अधिकाऱयांनी कर्मचाऱयांना दिल्या. यावेळी हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर प्रविण बरगाळे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विनोद करूर (सहाय्यक कार्यकारी अभियंता)
राज्य विद्युत मंडळाच्या नियमावलीनुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱया शनिवारी प्रत्येक उपविभागामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येत होते. परंतु कोरोनामुळे या बैठक मागील 6 महिन्यांपासून थांबविण्यात आल्या होत्या. या महिन्यापासून तक्रार निवारण बैठका पुन्हा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.









