केकेआरला 8 धावांच्या निसटत्या फरकाने नमवले
मुंबई / वृत्तसंस्था
आंद्रे रसेलने अष्टपैलू योगदान दिल्यानंतरही शनिवारी दिवसभरातील पहिल्या आयपीएल साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने केकेआरला 8 धावांनी नमवले आणि 12 गुणांसह आपले अव्वलस्थान आणखी भरभक्कम केले. गुजरातने 20 षटकात 9 बाद 156 धावांवर समाधान मानावे लागल्यानंतरही केकेआरला 8 षटकात 8 बाद 148 धावांवर रोखण्याचा पराक्रम गाजवत विजय प्राप्त केला.
विजयासाठी 157 धावांचे आव्हान असताना केकेआरचे आघाडीचे व मध्यफळीतील फलंदाज अतिशय स्वस्तात परतत राहिले. रिंकू सिंगने 35 धावा केल्या तर शेवटच्या षटकापर्यंत लढणाऱया रसेलने 25 चेंडूत 48 धावांची आतषबाजी केली. मात्र, यानंतरही केकेआरला 8 बाद 148 धावांवर समाधान मानावे लागले. रसेलच्या झंझावाती खेळीत 1 चौकार व 6 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला.
अल्झारी जोसेफने टाकलेल्या शेवटच्या षटकात 18 धावांची गरज असताना रसेलने पहिला चेंडू षटकारासाठी पिटाळला. मात्र, पुढील चेंडूवर डीपवरील लॉकी फर्ग्युसनने अप्रतिम झेल टिपत रसेलचा संघर्ष संपुष्टात आणला आणि इथेच केकेआरच्या आशाअपेक्षांना मोठा धक्का बसला. टायटन्सचा हा या हंगामात 7 सामन्यात सहावा विजय ठरला. केकेआरसाठी हा सलग चौथा पराभव होता.
अनुभवी वरिष्ठ गोलंदाज शमीने 2 षटकांच्या पहिल्या स्पेलमध्ये सॅम बिलिंग्ज (4) व सुनील नरेन (5) यांचे बळी घेत केकेआरला तिसऱया षटकातच 2 बाद 10 असे रोखून धरले. केकेआरचा बिलिंग्जला बढतीवर पाठवण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे येथे अधोरेखित झाले. त्यातच नितीश राणा (2) फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर साहाकडे झेल देत परतल्याने त्यांना आणखी धक्का बसला.
हार्दिक पंडय़ाचे अर्धशतक
प्रारंभी, कर्णधार हार्दिक पंडय़ाने हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावल्यानंतर गुजरात टायटन्सने 20 षटकात 9 बाद 156 धावांपर्यंत मजल मारली. पंडय़ाने 49 चेंडूत 67 धावांची आतषबाजी केली. यात 4 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. केकेआरने 43 चेंडू निर्धाव टाकले. डेथ ओव्हर्समध्ये त्यांनी केवळ 29 धावा दिल्या. आंद्रे रसेलने एकाच षटकात 5 धावात 4 बळी घेतले. रिंकू सिंगने डावात सर्वाधिक 4 झेल टिपले. शुभमन गिल स्वस्तात बाद झाल्याने संघाची सुरुवात खराब झाली होती.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स ः 20 षटकात 9 बाद 156 (हार्दिक पंडय़ा 49 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 67, वृद्धिमान साहा 25 चेंडूत 25, डेव्हिड मिलर 20 चेंडूत 27, राहुल तेवातिया 12 चेंडूत 17. अवांतर 10. आंद्रे रसेल 1 षटकात 5 धावात 4 बळी, टीम साऊदी 3-24, उमेश यादव, शिवम मावी प्रत्येकी 1 बळी).
कोलकाता नाईट रायडर्स ः 20 षटकात 8 बाद 148 (आंद्रे रसेल 25 चेंडूत 1 चौकार, 6 षटकारांसह 48, रिंकू सिंग 28 चेंडूत 35, उमेश यादव नाबाद 15, वेंकटेश अय्यर 17. शमी, यश दयाल, रशिद खान प्रत्येकी 2 बळी, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन प्रत्येकी 1 बळी).
डेव्हिड मिलर आयपीएलमध्ये 100 षटकार मारणारा 27 वा फलंदाज
गुजरात टायटन्सचा फलंदाज डेव्हिड मिलर शनिवारी आयपीएल इतिहासात 100 षटकार खेचणारा 27 वा फलंदाज ठरला. या डावखुऱया फलंदाजाने केकेआरविरुद्ध हंगामातील 35 व्या लढतीत या विक्रमाला गवसणी घातली. डावातील 12 व्या षटकात मिलरने सुनील नरेनला खेचलेला षटकार त्याच्यासाठी 100 वा ठरला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱया फलंदाजांच्या यादीत टी-20 लिजेंड ख्रिस गेल 357 षटकारांसह अव्वलस्थानी विराजमान असून 360 डिग्री फटकेबाजीसाठी वाखाणला गेलेला एबी डीव्हिलियर्स 239 षटकारांसह दुसऱया स्थानी विराजमान आहे. त्यानंतर रोहित शर्मा (233), महेंद्रसिंग धोनी (223) व केरॉन पोलार्ड (221) यांचा क्रमांक लागतो.









