महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर सहा सदस्य निवडून द्यायचे आहेत. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपा दोन, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1 आणि शिवसेना 1 असे पाचजण निवडून जातील. पण सहावा खासदार कोण होणार हे अधांतरीच आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी किमान 42 आमदार पाठीशी हवेत. बहुतेक पक्षाकडे जादाची मते आहेत. पण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण व परस्पर संवाद जवळजवळ संपुष्टात आल्याने ही सहावी जागा कोण मिळवणार आणि 42 आमदारांचा पाठिंबा कोण एकत्रित करणार असा प्रश्न तयार झाला आहे. कोल्हापूरचे संभाजी महाराज छत्रपती हे अपक्ष म्हणून या जागेवर दावा करीत आहेत. पण त्यांना अटी घालत सत्तारूढ शिवसेनेने त्यांना नाकारून शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव सहाव्या जागेसाठी पुढे केले आहे. पहिल्या जागेसाठी प्रवक्ते संजय राऊत आणि सहाव्या जागेसाठी संजय पवार. भाजपाने दोन जागासाठी आपली नावे जाहीर केलेली नाहीत. पण पियुष गोयल, विनय सहस्त्रबुध्दे, विनोद तावडे अशा नावांवर तेथे खलबते सुरू आहेत. जमलं तर तिसरी जागा पदरात पाडून घ्यायची असाही त्यांचा बेत आहे. भाजपाला मुंबई महापालिका जिंकायची आहे. त्यासाठी कृपाशंकर सिंह सारखी दाक्षिणात्य नावेही घेतली जात आहेत. काँग्रेसकडूनही गुलाब नबी आझाद वगैरे नावे घेतली जात आहेत. पण काँग्रेसचे जयपुरात चिंतन सुरू आहे. काँग्रेसची अवस्था चिंतन नव्हे चिंता करण्यासारखी आहे. अशी राजकीय टिप्पणी होत असली तरी काँग्रेसने आपल्या कार्यपध्दतीत काडीचा बदल केलेला नाही. करतील असे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यसभेवर सहावा खासदार कोण निवडला जातो. याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीवरून यापूर्वी देशातील काही आघाडी सरकारे अडचणीत आल्याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या पुढाकाराने महायुतीत फूट पाडून महाआघाडी सरकार अस्तित्वात आले. त्याला अडिच वर्षे होऊन गेली. महाआघाडी सरकारच्या तीन मंत्र्यांवर ठपका आहे. दोघांना राजीनामा द्यावा लागला आणि एक मंत्री तुरूंगातून कारभार करतात. याच दरम्यान जात, धर्माचे राजकारण आणि मतपेटय़ांचे सोशल इंजिनिअरिंग गतीमान झाले आहे. ओवेसी यांनी औरंगाबाद येथे औरंगजेब याच्या कबरीवर वाहिलेली फुले चांगलीच तप्त झाली आहेत. तर ओवेसींची अलीकडची भाषणे हिंदूंना बोचणारी आहेत. औरंगजेब, अकबर यांच्या बेगम कोण होत्या आणि मोदींच्या घराखाली मशिद होती असे म्हटले तर मोदींचे घर खोदणार का? वगैरे वक्तव्ये दुही वाढवणारी ठरत आहेत. ज्ञानव्यापी व कुतुबमिनार यावरूनही वातावरण तापत आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी व वसुली या वरूनही संताप आहे. या सर्व गढूळ व तप्त वातावरणात जो ते आपली पोळी भाजून घेण्याच्या व घर भरण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपती कोटय़ातून संभाजीराजे छत्रपती यांना सहा वर्षे खासदार केले होते. तेव्हा शरद पवार यांनी पेशवे छत्रपतींची नेमणूक करू लागले अशी गरळ ओकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद बळावला असा मनसे नेते राज ठाकरे यांनी अलीकडेच आरोप केला आणि राज्यात विविध भागात सभा घेऊन राष्ट्रवादीचा बुरखा फाडला. शरद पवारांनी नुकतीच काही ब्राह्मण संघटनांसोबत पुण्यात संवाद बैठक घेतली काही संघटनांनी त्यावर बहिष्कार टाकला तर काही उपस्थित राहिल्या. या बैठकीत काही ठोस झाले नाही. मेटकरी, भुजबळ, जयंत पाटील यापैकी कुणीच टिंगल टवाळी व मानहानीबद्दल बैठकीनंतर ब्र काढला नाही. त्यामुळे हा विषय तसा पेंडिंगच राहिला. महाराष्ट्राचे आराध्य म्हणून छत्रपती शिवरायांचा सर्वदूर सर्वथरात उल्लेख होतो व असा राजा होणे नाही असे म्हटले जाते ते खरेही आहे. महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठा आणि जातीने काही मराठा आहेत. त्यांची टक्केवारी तगडी आहे. त्यांचे आरक्षणासह अनेक प्रश्न आहेत. भाजपा जसा ब्राह्मण समाजाला गृहित धरतो तसा राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाला गृहित धरत आला आहे. पण गेले तीन ते चार वर्षे कोणताही समाज कुणाच्याही दावणीला स्वतःला बांधून घेत नाही. शिकलेली पिढी हुशार व चाणाक्ष आहे. तिला स्वहित, देशहित समजते. त्यामुळे हिंदू-मुस्लिम, मराठा, ब्राह्मण, माळी, वंजारी, धनगर अशा अनेक मतपेटय़ा करून सत्तेचे लोणी खाणे प्रस्थापित राजकारण्यांना कठीण होताना दिसते आहे. याच दरम्यान शिवसेनेचे हिंदुत्व आणि दैवत शिवाजी महाराज हे महत्वाचे आधार राजकीय विरोधकांकडून हालवले जात आहेत. मशिदींवरचे भोंगे, हनुमान चालीसा प्रकरण किंवा छत्रपती घराण्यातील संभाजीराजेंना राज्यसभेसाठी अतिरिक्त मते देण्यास शिवसेनेने घातलेली बंधने दिलेला अल्टिमेट, जोडीला शरद पवार यांनी फिरवलेला शब्द. यामुळे राजकीय पक्षांच्या मतपेटय़ा नव्याने बिघडताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेचे संजय राऊत यांनी ‘मावळे आहेत म्हणून राजे आहेत’ असे केलेले विधान आणि आता सहाव्या जागेची फाईल क्लोज केली वगैरे सांगणे त्याचबरोबर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शब्द फिरवून संभाजीराजे छत्रपती यांचा पाठिंबा काढून घेणे, अनेकांना जिव्हारी लागला आहे. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा सन्मान करायचा तर सहावी जागा कशाला पहिली हक्काची जागा द्यायला हवी होती असे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. पण सेनेने पहिलीही नाही आणि सहावीही नाही अशी भूमिका घेतली आहे. ती शेवटपर्यत तशीच टिकते की शेवटच्या क्षणी जाणते राजे त्यात काही बदल करतात हे बघायचे. भाजप तिसरी जागा लढवणार की राजेंना मतदान करणार हेही महत्वाचे आहे. खरे तर जे तुम्हाला हिसकावून घेता येत नाही ते तुम्ही कुणाला मागता कामा नये, पण संभाजीराजे आमचं ठरलंय असे म्हणत होते. अजून निवडणूक व्हायची आहे. अपक्ष व छोटे पक्ष आहेत. घोडेबाजार अटळ आहे. समोर राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत चाल प्रतिचाल होत राहिल. सहावा उमेदवार कोण विजयी होतो ते पहावे लागेल. पण, राज्यसभा निवडणूक आणि जाती धर्मातील व्देशाला खतपाणी यामुळे मतपेटय़ांचे राजकारण बदलते आहे. षटकार कोण मारतो आणि सामना कोण जिंकतो ते बघायचे.
Previous Articleबँकिंग नियमामध्ये आजपासून बदल
Next Article इंस्टाग्राम झाले डाऊन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








