नितीन सरदेसाई यांची मागणीः आनंदवाडी बंदर स्थळाला दिली भेटः मच्छीमारांनी मांडल्या व्यथा
वार्ताहर / देवगड:
तौक्ते चक्रीवादळातील देवगडमधील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त मच्छीमारांना सहानुभूतीपूर्वक भरीव मदत शासनाकडून तात्काळ मिळाली पाहिजे. तुटपुंज्या मदतीतून मच्छीमारांचे व्यवसाय पुन्हा उभे राहणार नाहीत. मृत मच्छीमारांच्या वारसांना केवळ एक धनादेश देऊन त्यांचे नुकसान भरून येणारे नाही. या मच्छीमारांच्या पाठिशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी असून मच्छीमारांना तात्काळ मदत मिळण्यासाठी राज्य शासनाकडे आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी येथे दिली.
सरदेसाई यांनी रविवारी दुपारी देवगड-आनंदवाडी बंदर स्थळाला भेट देऊन तौक्ते चक्रीवादळात मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे नेते शिरीष सावंत, खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, बोरिवली विभाग अध्यक्ष रमेश खाडये, मनसे चित्रपट सेना अध्यक्ष संतोष शिंगाडे, तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्राr, सचिव जगदीश जाधव, तालुका उपाध्यक्ष महेश नलावडे, विभाग अध्यक्ष अभी तेली, हरेश आडकर, शहर अध्यक्ष सचिन राणे, पडेल विभाग अध्यक्ष प्रकाश वारीक आदी उपस्थित होते. देवदुर्ग मच्छीमार पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाळेकर, मच्छीमार नेते भाई खोबरेकर, जगन्नाथ कोयंडे, संजय बांदेकर, द्विजकांत कोयंडे, सचिन कदम यांनी मनसे नेत्यांना तौक्ते चक्रीवादळात देवगड बंदरात उद्भवलेली स्थिती व मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
सरदेसाई म्हणाले, देवगडातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून आहे. तौक्ते चक्रीवादळात येथील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही मच्छीमार मृत्युमुखी पडले आहेत. या मच्छीमारांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळणे गरजेचे होते. मात्र, दुर्दैवाने ती मदत मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले.
तुटपुंज्या मदतीने व्यवसाय उभे होणार नाहीत
तौक्ते चक्रीवादळात मच्छीमारांच्या नौका फुटल्या असतील, तर त्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाच्या तुटपुंज्या मदतीने त्यांचे व्यवसाय उभे राहणार नाहीत. या मच्छीमारांना तात्काळ भरीव मदत सहानुभूतीपूर्वक शासनाने दिली पाहिजे. यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीचे पंचनामे शासनाकडे लवकरात लवकर सादर करणे गरजेचे आहे. नुकसानग्रस्त मच्छीमारांना तात्काळ भरीव मदत मिळण्यासाठी मनसेच्यावतीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सरदेसाई यांनी सांगितले. दरम्यान, सरदेसाई यांनी देवदुर्ग मच्छीमार संस्थेला भेट देऊन संस्थाचालक व मच्छीमार यांच्याशी संवाद साधला.
फिरल्याशिवाय नुकसान समजणार नाही
तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्हय़ात आले होते. मात्र, त्यांचा हा दौरा केवळ तीन तासांचा होता. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना श्री. सरदेसाई म्हणाले, आपण यावर भाष्य करू इच्छीत नाही. परंतु, नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष फिरल्याशिवाय नुकसान किती झाले हे समजणार नाही. पण, इतर नुकसानग्रस्तांसह मच्छीमार पुन्हा आपले व्यवसाय उभे करू शकतील, एवढी आर्थिक मदत राज्य निश्चित करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.









