गृहराज्यमंत्र्यांच अन् खत्रींच विमान, शेखर गोरेंच टेबल, उंडाळकरांची किटली, रांजणेंची चालण्याची काठी टिकणार का?
प्रतिनिधी /सातारा
जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आता 10 जागांसाठी 20 जण लढत आहेत. आज चिन्ह वाटप झाले असून सहकार पॅनेलने कालच कपबशी हे चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार आज निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी चिन्हाचे वाटप केले असून प्रचाराला सुरुवात झाली असून सहकारच्या कपबशीचा प्रचार सुरु झाला असून ही लढत महाविकास आघाडीमध्येच असल्याने पॅनेलच्या विरोधात असल्यांची चिन्हे गमतीदार अशी आहेत. त्यांच्याकडून कशा पद्धतीने प्रचार होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी लागलेल्या निवडणूकीपैकी 11 जागा या बिनविरोध झाल्या असून 10 जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ विधानपरिषदेचे सभापती रामराजे यांनी उपचार घेत घेतच फोनवरुन सहकर पॅनेलच्या कपबशी चिन्हाची घोषणा केली. त्यानुसार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांनी ते चिन्ह घेतले. त्यानुसार पॅनेलच्या सर्व उमेदवारांचे कपबशी हे चिन्ह आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणूकीत सहकार पॅनेलचे उमेदवार हे कपबशीतून विरोधकांना गोडाचा चहा पाजणार की त्यांना बशीत चहा ओतायला भाग पडणार हे निवडणूकीच्या निकालानंतर पहायला मिळेल. परंतु खरा प्रचार रामराजे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुरुवात होणार आहे. तरीही आताच आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सर्वच नेते मंडळींनी पॅनेलच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार सुरु केलेला आहे.
उंडाळकरांची किटली
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात कराड विकास सोसायटीतून ऍड. उदयसिंह उंडाळकर यांनी किटली हे चिन्ह घेतले आहे. त्यामुळे किटली आणि कपबशी अशी लढत होत आहे. त्यामुळे किटलीतला चहा कपबशीत येतो की किटली नेमकी काय करते हे पहायला मिळणार आहे.
राजंणेना चालण्याची काठी
जावलीतून आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात ज्ञानेश्वर राजंणे हे लढत आहेत. त्यांनी चालण्याची काठी हे चिन्ह घेतले आहे. काठी हे चिन्ह या पूर्वी जावलीमध्ये पाठीमागच्या निवडणूकांमध्ये घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चालण्याची काठी रांजणेंना आधार देणार की मध्येच वाटेत शशिकांत शिंदेंच्या कपबशीला साथ देणार हेही पहायला मिळणार आहे.
शेखर गोरेंचे टेबल
शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी दोन्ही ठिकाणहून उमेदवारी दिली असून दोन्ही मतदार संघातून त्यांनी टेबल टाकले आहे. त्यांचे विरोध हे सहकार पॅनेलमधील तुल्यबळ असले तरीही राष्ट्रवादीचे पाणी प्यायलेले शेखर गोरे हे असल्याने त्यांचे टेबल या निवडणूकीत लागणार की मनोज पोळ व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांची कपबशी चालणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
शंभूराज देसाई यांचे विमान
पाटणमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची पाटण विकास आघाडी आहे. त्या आघाडीचे चिन्ह हे विमान आहे. तेच त्यांनी या निवडणूकीत घेतले आहे. त्यामुळे पाटण विकास आघाडीचे विमान हवेंत उडणार की सत्यजितसिंह पाटणकरांच्या सहकार पॅनेलची कपबशी चालणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, याकडे सगळय़ांच्या नजरा आहेत.
कोरेगावात खत्रीनी घेतले विमान
खत्री यांनी धाडस केले असून ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव महाडिक यांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे खत्रीचे विमान मतदारांपर्यंत पोहचणार की महाडिकांची कपबशी चालणार हे पहायला मिळणार आहे.
खटावमध्ये घार्गेचा ट्रक्टर
खटावमध्ये बंडखोरी केलेले माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी ट्रक्टर हे चिन्ह घेतले आहे तर सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार असलेले नंदू मोरे यांची कपबशी आहे. नंदू मोरे हे पैशापाण्याचे गडगंज आणि नेत्यांची साथ आहे. परंतु आकडेमोडीत व डावपेचात पटाईत असलेले प्रभाकर घार्गे हे ट्रक्टरने मतदारांच्या शेतापर्यंत पोहचणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.
महिला मतदार संघातील उमेदवारांची मजेशीर चिन्हे
फलटणचे माजी आमदार चिमणराव उर्फ सुर्याजी कदम यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शारदादेवी कदम यांनी महिला प्रवर्गातून या निवडणूकीत सहकार पॅनेलच्या विरोधात उभ्या असून त्या ऍड. उदयसिंह उंडाळकरांच्या नातेवाईक आहेत. त्यांनी पतंग हे चिन्ह घेतले आहे. त्यामुळे त्यांचे पतंग मतांची बेरीज साधणार की कपबशी त्यांची दोर काटणार हे पहायला मिळणार आहे. तसेच चंद्रभागा काटकर यांनी शिलाई मशिन हे चिन्ह घेतले आहे. या दोघींच्या विरोधात सहकार पेनेलमधून कपबशी घेवून ऋतुजा पाटील आणि कांचन साळुंखे कपबशी या तयार आहेत.









