इस्लामपूर / प्रतिनिधी
इस्लामपूर मध्ये चार तालुक्यासाठी होणाऱ्या सहकार न्यायालयामुळे पक्षकारांना जलद न्याय मिळणे सुलभ होणार आहे. या न्यायालयातील प्रलंबित खटले लवकर निकालात काढण्यासाठी आधुनिक न्याय प्रणालीचा वापर करण्यात येईल. न्याय व्यवस्था अधिक गतीशिल करुन त्यातील अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती बी.पी.कुलाबावाला यांनी केले.
येथील शिवाजी चौकातील सहकार न्यायालय इमारतीचा अभासी उदघाटन सोहळा न्यायाधिश कुलाबावाला यांच्या हस्ते व अपिलीय महाराष्ट्र राज्य सहकारमुंबईचे अध्यक्ष जी.ए.सानप यांच्या उपस्थितीत येथील राजारामबापू नाटयगृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नाटयगृहातील या सोहळयात सहकार न्यायालयाचे न्यायाधिश एबी.कट्टे, पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश शेखर मुनघाटे, न्यायाधिश सतिश चंदगडे, अभिजित सोलापूरे, भुवन ठाकुर यांच्यासह अन्य न्यायाधिश व वकिल उपस्थित होते. दरम्यान बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.एस.यु.संदे स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले, चार तालुक्यांसाठी होणारे हे सहकार न्यायालय राज्यातील दुसरे न्यायालय असून यामुळे पक्षकारांबरोबरच वकिलांनाही सोयीचे होणार आहे.








