प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2021-22 ते 2026-27 कालावधीसाठी होणार असून, विविध टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम 2014 चा नियम 19 अन्वये ही निवडणूक होणार आहे. संबंधीत सहकारी संस्थांकरीता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक ही करण्यात आली आहे. जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी व सहकार संस्था, सातारा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
याकरीता उमेदवारांची अर्ज स्विकृती सुरू असुन, अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडुन उमेदवारांना निवडणूक चिन्हे देण्यात येणार आहेत. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात मतदान, मतमोजनी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दि. 22 मार्च या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी अर्ज भरण्याकरीता लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यातील एकुण सहकारी संस्थामध्ये, महाबळेश्वर मधील-3, सातारा-3, खंडळा-4, कोरेगांव-4, पाटण-22, कराड-23, खटाव-15, माण-3, जावली-8 अशा एकुण 87 सहकार संस्थांच्या निवडणूका पार पडणार आहेत.









