सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / कराड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. मात्र नंतर 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 31 डिसेंबरपासून सहा महिन्यात या निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत दिल्लीसह राज्याच्या विविध भागात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे पाहता निवडणुका पुढे जातील, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराबाबत सहकार विभागाकडे काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने या बँकेची चौकशी सुरू आहे. यातील काही तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. तरीही चौकशीनंतरच सर्व काही स्पष्ट होईल. चौकशी करताना अध्यक्ष कोण आहे, हे पाहिले जात नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यात यावर्षी उसाचे विक्रमी उत्पन्न झाले आहे. हा ऊस संपवण्याचे मोठे आव्हान आहे. शरद पवार यांनी याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार आजारी कारखान्यांना थकहमी दिलेली असून कारखाने जास्तीत जास्त सुरू करण्यावर भर देणार आहे. ज्या कारखान्यांनी गाळप परवाना घेतलेला नाही, त्यांच्यावर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.









