ऑनलाइन टीम / पुणे :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टने देखील अशीच मदत ससून रुग्णालयाला दिली आहे. मंदिरातील मूर्तीरुपी परमेश्वराकडून रुग्णालयात रुग्णांसाठी असलेल्या डॉक्टर व नर्सरुपी परमेश्वराच्या संरक्षणासाठी सुमारे 150 पीपीई किट व 1 हजार लीटर सॅनिटायझर देण्यात आले आहेत.
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयाला पीपीई किट व सॅनिटायझर देण्यात आले आहेत. यावेळी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय शेटे, समाजसेवा अधिक्षक किरण कांबळे, ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, नंदकुमार सुतार, उल्हास कदम आदी उपस्थित होते.
अॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सेवा देण्याचे काम डॉक्टर्स, नर्स करीत असतात. स्वत:च्या कुटुंबियांना दूर ठेऊन रुग्णांसाठी हे डॉक्टर अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी असलेल्या परमेश्वररुपी डॉक्टरांना आम्ही संरक्षणात्मक किट दिले आहेत.









