इचलकरंजी येथील न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रेनाईट औद्योगिक सहकारी संस्था अपहार
प्रतिनिधी / कोल्हापूर
इचलकरंजी येथील न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रेनाईट औद्योगिक सहकारी संस्थेत 3 कोटी 25 लाखाचा अपहार झाला होता. या प्रकरणी संस्थेचा चेअरमन तुळशीदास अरविंद देसाई कांबळे (रा. रुई, हातकणंगले) याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी गुरुवारी जेरबंद केले. 19 सप्टेंबर 2019 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून अर्थ सहाय्य घेवुन इचलकरंजी येथे 2010 साली न्यू महाराष्ट्र औद्योगिक सहकारी संस्था उभारण्यात आली. संस्थेच्यावतीने ग्रेनाईट उत्पादन युनिट सुरु केले होते. याचा चेअरमन म्हणून तुळशीदास देसाई-कांबळे हा काम पाहत होता. 2010 ते 2017 या कालावधीतील संस्थेचे लेखापरिक्षण उपलेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी पूर्ण केले. यामध्ये संस्थेत 3 कोटी 25 लाख 18 हजार 658 रुपयांचा अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले. यावरुन 19 सप्टेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल करुन तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
संशयित तुळशीदास देसाई-कांबळे हा कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथे येणार असल्याची माहिती उपअधीक्षक पद्मा कदम यांना मिळाली. पोलिस निरीक्षक इंदलकर, दिलीप कारंडे, दिनेश उंडाळे, प्रविण चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचून तुळशीदास देसाई-कांबळेला पकडले.









