मुंबई/प्रतिनिधी
कर्नाटकव्याप्त भागात राहणाऱ्या मराठी भाषिक गावांना महाराष्ट्रात आणण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केल्यानंतर या चर्चेनं जोर धरला आहे. त्यातच कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई कर्नाटकाला जोडण्याची मागणी केली होती. कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांकडून झालेल्या या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचीच राहणार असं प्रत्युत्तर दिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, “केवळ राज्य प्रमुख या नात्याने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत वक्तव्य केलं असून, त्याला कोणताही आधार नाही. हा वाद अनेक वर्षाचा आहे. कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नाही. कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर निवडून यायचे. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली,” असं सांगत पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं.
काय म्हणाले होते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री ?
“महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद भागात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की, मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. त्यामुळे जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही, तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं,” असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी म्हटलं होतं.