ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला शनिवारी रात्री उशिरा सर्पदंश झाल्याची घटना पनवेलमधील वाजेपूर येथील फार्महाऊसवर घडली. सर्पदंशानंतर मध्यरात्री 3 वाजता सलमानला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साप बिनविषारी असल्याने प्राथमिक उपचार करून आज सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
वाजेपूर येथे सलमानचे अर्पिता फार्म हाऊस आहे. नाताळची सुट्टी आणि सोमवारी 27 डिसेंबरला येणाऱ्या वाढदिवसानिमित्त सलमान मित्रांसह या फार्म हाऊसवर होता. रात्री उशिरा सलमान फार्महाऊस बाहेर पडला. त्यावेळी त्याला सर्पदंश झाला. त्यानंतर तात्काळ त्याला एमजीएम रुग्णालय कामोठे याठिकाणी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करुन आज सकाळी 9 च्या सुमारास सलमानला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ सुधीर कदम यांनी दिली.









