ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात जारी करण्यात आलेले लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी वाहनांना बाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सलग पाचव्या दिवशी देखील पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 60 पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत 73.40 रुपयांवरून 74 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर डिझेलची किंमत 71.62 रुपयांवरून 72.22 रुपये झाली आहे.
कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत अनुक्रमे 75.94, 80.98 आणि 77.96 इतकी वाढली आहे. तर डिझेलसाठी या महानगरांना आता 68.17, 70.92 आणि 70.64 रुपये मोजावे लागणार आहेत.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल – डिझेलच्या किंमती बदल होत आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर चे कमिशन आणि अन्य किंमती जोडल्याने किंमत वाढत आहे . त्यामुळे आता कोरोना संकटाबरोबरच सामान्यांना महागाईचा झळ सहन करावी लागणार आहे.









