अल अमेरात (ओमान) / वृत्तसंस्था
रिची बेरिंग्टनची 70 धावांची तडफदार खेळी आणि जोश डॅव्हेच्या 4 बळींमुळे स्कॉटलंडने आयसीसी टी-20 विश्वचषक पात्रता फेरीत पापुआ न्यू गिनिया संघाचा 17 धावांनी सहज फडशा पाडला आणि ब गटात अव्वलस्थान काबीज केले. यापूर्वी, पहिल्या सामन्यात बांगलादेशसारख्या कसलेल्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारणाऱया स्कॉटलंडने येथेही आपली विजयी मालिका कायम राखल्याचे या निकालाने स्पष्ट झाले.
बेरिंग्टनने मॅथ्यू क्रॉससमवेत (45) तिसऱया गडय़ासाठी 65 चेंडूत 92 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. याशिवाय, कॅलम मॅकल्यूडसह आणखी 33 धावांचे योगदान दिले. स्कॉटलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर निर्धारित 20 षटकात 9 बाद 165 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर पीएनजी संघाचा डाव 19.3 षटकात 148 धावांमध्येच गारद झाला. जोश डॅव्हेने 18 धावातच 4 फलंदाजांना गारद करत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. येथील पराभवासह पीएनजीचे पात्रता फेरीतील आव्हान संपुष्टात आले. त्यांचा हा पात्रता फेरीतील सलग दुसरा पराभव होता. या पात्रता फेरीतील सलामी लढतीत त्यांना ओमानने 10 गडी राखून पराभूत केले होते.
विजयासाठी 166 धावांचे आव्हान असताना पीएनजीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजीवर भर देणे क्रमप्राप्त होते. पण, प्रत्यक्षात त्यांची फलंदाजी लाईनअप अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत राहिली. पहिल्या 6 षटकातच त्यांची 5 बाद 35 अशी दाणादाण उडाली आणि यावेळी सामन्याचा निकाल देखील जवळपास निश्चित झाला.
नॉर्मन व्हॅनुआ (47) व किपलिन डोरिगा (18) यांनी 29 चेंडूत 53 धावांची भागीदारी साकारत आव्हान कायम राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, 17 व्या षटकात वॅटने ही जोडी फोडली आणि पीएनजी संघाच्या उरल्यासुरल्या आशाअपेक्षा संपुष्टात आल्या. डॅव्हेने नंतर व्हॅनुआला बाद केले.
बेरिंग्टनची जोरदार फटकेबाजी
तत्पूर्वी, बेरिंग्टनने 49 चेंडूंच्या खेळीत 3 षटकार व 6 चौकारांची आतषबाजी करत बडय़ा धावसंख्येसाठी उत्तम पायाभरणी करुन दिली. पण, पीएनजीने शेवटच्या 3 षटकात केवळ 19 धावांमध्ये 6 फलंदाज गारद करत त्यांच्या घोडदौडीला ब्रेक लावला होता. मोरिया (4-31) व सोपर (3-24) हे पीएनजी संघाचे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. जॉर्ज मन्सेने 3 चौकारांसह फ्लाईंग स्टार्ट मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोरियाने कर्णधार कोएत्झरला बाद करत पहिले यश संपादन केले. क्रॉस व बेरिंग्टन यांच्या दमदार फलंदाजीमुळे स्कॉटलंडने 10 षटकात 2 बाद 67 धावांपर्यंत मजल मारली होती.