अध्याय बारावा
ईश्वराने मनुष्याला निमित्याला पुढे केला असून त्याचे सर्व व्यवहार परमेश्वरच त्याच्या हृदयात राहून यंत्राप्रमाणे त्याच्याकडून करवून घेत असतो असा भावार्थ गीतेतील पुढील श्लोकातून निघतो. म्हणूनि तू ऊठ मिळीव कीर्ति। जिंकूनि निष्कंटक राज्य भोगी। मी मारिले हे सगळे चि आधी । निमित्त हो केवळ सव्य-साची। 11.33 तुकाराम महाराज हेच, निमित्ताचा धनी केला असे प्राणी। माझे माझे म्हणोनि व्यर्थ गेला।
या अभंगात सांगतात. भगवंत उद्धवाला म्हणाले, हे ओळखून जो जीवन्मुक्त होतो, तोच मत्स्वरूपाला येऊन पोचतो.
सर्व कर्तेकरविता ईश्वर असून आपण फक्त निमित्तमात्र आहोत हे ज्याच्या लक्षात येतं तो संसारातील कोणत्याही आसक्तीत गुंतत नाही. अमुक एक गोष्ट हवी अशी इच्छा झाली व त्यानुसार प्रयत्न केल्यावर ती मिळाली की, माणसाला सुख वाटतं त्याउलट ती मिळाली नाही की, तो दुःखी होतो. परंतु ज्याला सर्वच ईश्वराच्या मर्जीनुसार चाललेलं असून, अमुक गोष्ट मिळाली किंवा नाही याबद्दल सुख किंवा दुःख वाटून घेणं निरर्थक आहे हे लक्षात येतं तो त्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या आसक्तीत रहात नाही. असा मनुष्य फक्त ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी आवश्यक ते आत्मज्ञान झालं की, तो मृत्यूनंतर ईश्वराला जाऊन मिळतो. तोपर्यंतच्या आयुष्यात मात्र त्याला उरलेल्या प्रारब्धानुसार कर्मे करावी लागतात. त्यातील भोग भोगूनच संपवावे लागतात. त्यातून कुणालाही सूट मिळत नाही.
उदाहरणार्थ जनक राजा हा राज्यपदावर शोभत होता. शुक्राचार्य आपल्या प्रारब्धाप्रमाणे नग्नस्थितीतच राहात असत. नारदाने तर नेहमी लोकांमध्ये कलहच लावीत असावे अशी त्याची प्रारब्धगती होती. वसि÷ाला उपाध्येपणा करावा लागला. भीष्म शरपंजरी निजला. याज्ञवल्क्मयाला दोन बायका असून प्रारब्धाच्या तावडीत सांपडून तो त्यातच वागत असे. उद्धवा ह्याप्रमाणे प्रारब्धाची शक्ति त्रैलोक्मयांत अनिवार वाढलेली आहे. ज्याप्रमाणे गारुडय़ाच्या हातातील वानर असतो, त्याप्रमाणे प्रारब्धाने जीव बांधलेले असतात. ह्या त्रैलोक्मयात मीच एक असून त्या जीवांच्या प्रारब्धगतीने अनेकरूपाने भासमान होतो. ‘विश्वतश्चक्षु’ असे श्रुतीत म्हटले आहे, यावरून या सर्व निरनिराळय़ा व्यक्तीत मीच असल्याचे स्पष्ट होते. मातीची निरनिराळय़ा आकाराची भांडी केली आणि त्यांना निरनिराळी नावे दिली, तरी ती सारी मातीचीच असतात. त्याप्रमाणे सृष्टि माझ्याच रूपाने निरनिराळय़ा नावांनी व्यक्त होत असते. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपण अनेक रूप धारण केल्याचे पाहतो, त्याप्रमाणेच मी विश्वात्मा एकच असून अनेक रूपे घेऊन वावरत असतो. वडाच्या छोटय़ाशा ‘बी’ ला जमीन व पाणी मिळाले म्हणजे त्याचा अंकुर वाढून अत्यंत बळकट व अफाट विस्ताराचा असा वृक्ष आकाराला येतो. त्यावेळी त्याचे नाम, रूप, पुष्प, हे सर्व त्या बिजातच सामावले आहे हे लक्षात येते. त्याप्रमाणे विश्वाच्या आकाराच्यामागे केवळ चिदात्माच असतो. मूळ बीजाची जी गोडी असते, तीच उसाच्या प्रत्येक कांडात असते. त्याप्रमाणे चिदात्म्याच्यापासून जे जे झालेले आहे, ते ते शुद्ध चैतन्यानेच भरलेले आहे. आणि चित्स्वरूपच आहे. ज्याप्रमाणे बीज आणि ऊस ही दोन्ही एकरूप असतात, त्याप्रमाणे प्रपंच हा चित्स्वरूपच आहे. कपडय़ामध्ये जसे धागेच सर्वकाही असतात, त्याचप्रमाणे या परमात्म्यामध्येच सारे विश्व भरले आहे.
माझ्याहून निराळे असे खरोखर अणुमात्रसुद्धा येथे कांही नाही. वास्तविक संसाराच्या रूपाने मी भगवंतच स्फुरद्ªप होत असतो. वास्तविक पाहू गेले तर सूत हे स्पष्टच दिसत असले, तरी त्याला कापड असे म्हणतात. त्याप्रमाणे आपणापुढे प्रत्यक्ष चैतन्य खेळत असताही वेडे लोक त्याला संसार असे म्हणतात. सुताशिवाय ज्याप्रमाणे वस्त्र दिसत नाही, त्याप्रमाणे माझ्याशिवाय प्रपंच नाही. म्हणून संसारिक कर्तव्ये निरपेक्षतेनं जो पार पडतो आणि त्यातील सुखदुःखात हर्ष वा खेद मानत नाही तो एकप्रकारे माझीच सेवा करत असतो.
क्रमशः







