एखाद्या व्यक्तीचे डोळे नैसर्गिकरित्या निळे असणे हे अतिशय दुर्मिळ असते. युरोपात निळय़ा डोळय़ांच्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. मात्र, एकंदर लोकसंख्येच्या तुलनेत या रंगाच्या डोळय़ांच्या व्यक्ती कमीच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे एका वेगळय़ा दृष्टीने इतर लोक पहात असतात. जगातील सर्व निळय़ा डोळय़ांच्या व्यक्ती एकमेकांच्या नातेवाईक आहेत का ? असा एक प्रश्न सध्या संशोधकांच्या वर्तुळात चर्चिला जात आहे. याला कारण हे एक नवे संशोधन.

या संशोधनातून असे दिसून आले आहे की. जगातील सर्व निळय़ा डोळय़ांची माणसे एकमेकांची नातेवाईक आहेत. कारण त्यांच्या डोळय़ांची ही निळी छटा त्यांना एकाच व्यक्तीपासून मिळालेली आहे. याचाच अर्थ असा की सर्व निळय़ा डोळय़ांच्या व्यक्तींमध्ये या एका व्यक्तीची जनुके आहेत. एका विशिष्ट जीनच्या ‘ब्लॉक’ होण्यातून डोळय़ांना निळा रंग प्राप्त होतो. या साऱया नीलनेत्रधारक व्यक्तींचा एकच पूर्वज होता, जो 6 ते 10 हजार वर्षांपूर्वी जन्मला होता. त्याच्यापासून डोळे निळे असण्याचा वैशिष्टय़ाचा प्रारंभ झाला आहे. हे संशोधन कोपेनहेगन विद्यापीठात करण्यात आले असून अद्यापही निश्चित निर्णयाप्रत येण्यासाठी सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते.









