प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमधील उपचाराचा दर एकच ठेवावा आणि तोदेखील वाजवी असावा, अशी मागणी बेळगाव शहरातील माजी नगरसेवकांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलमधील कारभार सुधारावा आणि अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने दाखल करून घेतले जावे, अशी मागणी शहरातील माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱयांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी एक ठराविक निश्चित दर आकारण्याऐवजी मनमानी करून अव्वाच्या सव्वा दर आकारला जात आहे.
तसेच काही खासगी हॉस्पिटल्स रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची मागणी करत आहे. ज्याला काहीच अर्थ नसून यामुळे केवळ पैसे व वेळेचा अपव्यय होत आहे. त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमधील कारभार सुधारावा आणि तेथील बेड्सची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारी नियमानुसार कोरोनाग्रस्त रुग्णांवर घरात उपचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आयसोलेशन वॉर्डमध्ये 10 खाली एचआरसीटी स्कोर असलेल्या रुग्णांनाच दाखल करून घेतले जात आहे. तेव्हा 10 पेक्षा जास्त एचआरसीटी स्कोर असलेल्यांनाही आयसोलेशन वॉर्डात दाखल करून घ्यावे. तसेच रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व आवश्यक औषधे उपलब्ध करावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी निवेदनाद्वारे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, राकेश पलंगे, संजय शिंदे, राजू बिर्जे आदींनी मागणी केली आहे.









