मुंबई \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून सरकारवर निशाणा साधत म्हणाले, सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार? अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकतं यासंदर्भात विचार करायला हवा. ५० टक्क्यांवरचं आरक्षण राज्याने दिलं होतं. त्यामुळे याविरोधात केंद्र सरकार कशी पुनर्विचार याचिका करेल?” असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. आपली असफलता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला. मी केंद्राचं अभिनंदन करेन की इतक्या वेगानं केंद्रानं ही भूमिका मांडली, असे देखील ते म्हणाले.
102 व्या घटना दुरुस्तीने राज्याचे अधिकार राज्याचे राहतील असं म्हटलं आहे. मात्र, त्याबद्दल कोर्टाचं दुमत होतं. दोन न्यायाधीशांनी घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार आबाधित राहणार असल्याचं म्हटलं आहे. तर तीन न्यायाधीशांनी एखाद्या वर्गाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राचा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हे सर्व अधिकार राज्यांचेच असल्याचं सांगण्यासाठी केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे, असं फडणवीस म्हणाले. केंद्राने राज्याचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. राज्य सरकार एखाद्या समाजाला मागास घोषित करू शकतं. मागासवर्ग आयोगाबाबत कोर्टाने दिलेल्या निकालावर राज्याने पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी. केंद्र सरकार करू शकत नाही. राज्यपालांच्या हातात काही नसताना देखील सत्ताधारी राज्यपालांना भेटत आहेत. ही सर्व नौटंकी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
Previous Articleसमाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे काळाची गरज
Next Article आरोग्यमंत्री डॉ.के.सुधाकर यांची डीआरडीओ कॅम्पसला भेट








