प्रतिनिधी/ बेळगाव
विविध राज्यांतील आणि जिल्हय़ांतील अडकून पडलेल्या परप्रांतियांसाठी रेशन पुरवठा सुरू आहे. मात्र, वारंवार होणाऱया सर्व्हर डाऊनमुळे या कामास विलंब लागत आहे. सर्व्हर डाऊनची समस्या तात्काळ सोडविण्यात यावी, अशी मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे. मंगळवार दि. 26 मेपासून परप्रांतीय कामगार आणि नागरिकांना रेशन पुरवठा सुरू करण्यात आला आहे. रेशनकार्ड नसले तरी केवळ आधार कार्डावर त्या नागरिकांना 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. शहर व परिसरातील रेशन दुकानांतून परप्रांतियांना रेशन पुरवठा सुरू आहे. रविवार दि. 31 पर्यंत त्यांना रेशनवरील तांदूळ देण्यात येणार आहे. जूनमध्येही परप्रांतीय नागरिक आणि कामगारांसाठी ही सुविधा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे साहाय्यक उपसंचालक सिद्राम मारीहाळ यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांचे प्रचंड हाल झाले. यामध्ये विविध कामासाठी अन्य राज्यांतून बेळगाव जिल्हय़ात आलेल्या परप्रांतीय नागरिक आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. रेशन कार्ड नसल्याने त्यांना रेशनही देता येत नव्हते. यामुळे परप्रांतियांचे अक्षरश: हाल झाले. याची दखल घेऊन केंद्र सरकारने रेशन कार्ड नसले तरी आधार कार्डवर परप्रांतियांना रेशन पुरवठा करण्यात यावा, अशी सूचना केली होती. याची अंमलबजावणी मंगळवार दि. 26 पासून सुरू झाली आहे. मात्र, सर्व्हर डाऊन समस्येमुळे रेशन दुकानदारांसह परप्रांतियांनाही दुकानांसमोर ताटकळावे लागत आहे. 5 किलो तांदुळसाठी तासभर उभे राहावे लागत आहे. यामुळे सर्व्हर डाऊनची समस्या सोडविण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे.
याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता, तांत्रिक कारणामुळे सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. 1 जूनपासून ही समस्या सुटणार असून जूनमध्येही परप्रांतियांसाठी रेशनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती खात्याचे साहाय्यक उपसंचालक सिद्राम मारीहाळ यांनी दिली आहे.









