भूमि अभिलेखचा सर्व्हर अनेक दिवस बंद : वरिष्ठ कार्यालयाकडून दुरूस्तीबाबत उदासीनता
सर्वसामान्य ग्रामस्थांची होत आहे अडचण पोटहिस्सा स्वतंत्र सातबारा मोहिम कधी?
मनोज चव्हाण / मालवण:
15 ऑक्टोबरपासून भूमी अभिलेख विभागाची ऑनलाईन जमीन मोजणी आणि तारीख निश्चितीसाठी असणारा सर्व्हर डाऊन असल्याने जिल्हय़ातील सर्वच तालुक्यातील जमीन मोजण्या रखडल्या आहेत. यामुळे जमीन मोजण्यासाठी येणाऱया असंख्य ग्रामस्थांना कार्यालयात येऊन माघारी फिरावे लागत आहे. तसेच जमीन मोजणीसाठी पैसे भरूनही तारखा मिळत नसल्याने मूळ सिंधुदुर्गस्थित मुंबईकरांचेही हाल होत आहेत.
दरम्यान, याबाबत भूमी अभिलेख कार्यालयातील मुंबई आणि पुणे येथील विभागातून सर्व्हरवर निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून पुन्हा ऑफलाईन जमीन मोजणीचे पैसे भरून तारखा निश्चित करण्याची मागणी होत आहे.
ग्रामस्थांचे होत आहेत हाल
भूभाग निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून जमीन मोजणीकरीता पैसे भरून घेतले जात असतात. पैसे भरल्यानंतर संबंधित जमीन मालकांना आणि लगतच्या जमीन मालकांना नोटीस पाठवून मोजणीची तारीख दिली जात असते. मात्र गेले अनेक दिवस ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने एकही मोजणीची तारीख संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हय़ात देण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ पैसे घेऊन कार्यालयात फेऱया मारत आहेत. सर्व्हर सुरू होत नसल्याने जमीन मोजणीचे पैसेही भरून घेतले जात नाहीत. सर्व्हर केव्हा सुरू होईल, याबाबतही ठोस माहिती दिली जात नसल्याने भूमी अभिलेखच्या वरिष्ठ अधिकाऱयांचे सिंधुदुर्गवर दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक कर्मचाऱयांचे हाल होताना दिसत आहेत.
पोटहिश्शांची स्वतंत्र मोजणी मोहीम कधी?
वर्षानुवर्षे भांडणतंटय़ांचे कारण ठरणाऱया पोट हिश्शांचेही आता स्वतंत्रपणे सातबारा होणार असून याकरिता भूमी अभिलेख विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गावोगावी जाऊन शेतकऱयांचे सातबारा त्यांच्या हिश्शाप्रमाणे वेगळे केले जाणार असून त्यानुसार वैयक्तिक नकाशेही तयार करण्यात येणार आहेत. सदरची मोहीम राज्यभरात राबविण्यात येत असताना सिंधुदुर्ग जिल्हय़ात मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ात भूमी अभिलेख विभागाकडून अन्याय केला जात असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
सातबारा उताऱयांवर भावा-भावांची, बहिण-भावांची तसेच सहहिश्शेदारांची नावे असतात. सातबारावरील नावानुसार प्रत्येकाचा हिस्सा निश्चित असतो. त्यानुसार क्षेत्राची वाटणी होऊन त्यांच्या ताब्यात ते क्षेत्र असते. ताब्यात असलेल्या क्षेत्रानुसार, वाटणी झालेल्या क्षेत्रानुसार त्यांची वहिवाटही असते. मात्र सातबारा एकच असल्याने पोटहिश्शावरून भांडणतंटा होऊन अनेक प्रकारचे वाद होतात. काही वाद न्यायालयातही जातात. राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने या पोटहिश्शांचे स्वतंत्र सातबारा उतारे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संमत्तीने अभिलेख पोटहिस्सा दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील शिरढोणमध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख सुवर्णा म्हसणे यांनी याबाबतचा पथदर्शी प्रकल्प यापूर्वी राबविला होता. दरम्यान भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. शिरढोण गावातील ज्या शेतकऱयांनी पोटहिस्सा दुरुस्त करून स्वतंत्र सातबारा उताऱयासाठी अर्ज केले होते, त्यांचे सातबारा स्वतंत्र झाले आहेत. त्याबाबतचा अहवाल अभ्यास समितीला सादर केला होता. या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून समितीने केलेल्या शिफारशीनुसार भूमि अभिलेख विभागाचे संचालक एस. चोक्कलिंगम यांनी संमत्तीने अभिलेख पोटहिस्सा ही मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना यात सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.









