प्रतिनिधी/ मडगाव
म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर करण्यात आलेल्या आंतरराज्य तपासणीच्या वेळी कर्नाटकच्या अधिकाऱयांनी आणि पोलिसांनी गोव्याच्या अधिकाऱयांकडे जी अरेरावी केली त्याची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन त्यात लक्ष घालावे अशी मागणी करणारे पत्र गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पाठविले आहे.
शुक्रवारी ही संयुक्त पाहणी ठेवण्यात आली होती. त्या पाहणीत भाग घेण्यासाठी गोव्याच्या जलस्रोत खात्याचे अधिकारी गेले असता कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडविले. त्यांची ओळखपत्रे काढून घेतली आणि त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, याकडे सरदेसाई यांनी सरन्यायाधीशांचे लक्ष वेधले आहे. कर्नाटकाची ही कृती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उपमर्द आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून कर्नाटकाने या नदीचे पाणी वळविल्याने गोव्यावर विपरित परिणाम दिसू लागला आहे. हे पाणी वळविल्यास गोव्यात पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीसाठीच्या पाण्याची गंभीर समस्या उद्भवेल, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
कर्नाटकाची अरेरावी वाढणार
दरम्यान, यासंदर्भात सरदेसाई यांनी प्रसारित केलेल्या एका व्हिडीओ संदेशात कर्नाटकाची ही दादागिरी केवळ झलक असून यापुढे त्यांची अरेरावी आणखी वाढणार असल्याचे म्हटले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सौदा करून म्हादई कर्नाटकाला कधीच विकली असून शुक्रवारी जे काही झाले ते पाहिल्यास ‘आम्ही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे म्हादईचा सौदा केल्यामुळे आता तुम्हाला येथे येण्याचा काहीच अधिकार नाही’ हे सांगण्याचा हा प्रयत्न होता, अशी टीका त्यांनी केली आहे.
अधिकृत पाहणीच्या वेळी कर्नाटक सरकारची ही मुजोरी असल्यास इतर वेळी त्यांची वागणूक कशी असेल याची कल्पनाच करता येत नाही. केंद्रात, गोव्यात आणि कर्नाटकात तिन्ही ठिकाणी भाजपची सरकारे असताना गोवा सरकार या महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा काढू शकत नाही यावरून हा सौदा कसला ते सिद्ध होते, असा आरोप त्यांनी केला आहे.









