ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायायलयाच्या नोंदणी विभागाकडून वकिलांना नियमितपणे पाठवण्यात येणाऱ्या इमेलमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ या जाहिरातीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो झळकला. त्यामुळे शुक्रवारी दिल्लीत गोंधळ निर्माण झाला. वकीलांनी या बाबीवर आक्षेप घेतल्यानंतर एनआयसीने सारवासारव करुन मोदींचा फोटो हटवला.
एनआयसी अर्थात नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमार्फत केंद्र सरकार 2022 या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे प्रमोशन करत आहे. शुक्रवारी न्यायालयाच्या या नोंदणी विभागाकडून वकिलांना ‘आझादी का अमृत महोत्सव’ या जाहीरातीचा मेल आला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो झळकला. अशा प्रकारांमुळे न्यायालयाचे लोकशाहीचे स्वतंत्र अंग म्हणून अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असा आक्षेप वकीलांनी घेतला. वकीलांच्या आक्षेपानंतर एनआयसीने सारवासारव करुन मोदींचा फोटो या जाहीरातीमधून हटवला.
दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने शुक्रवारी उशिरा एक परिपत्रक काढले. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला इमेलची सुविधा पुरवणाऱया एनआयसीला संबंधित जाहिरात आणि फोटो मेल सिस्टीममधून काढण्याचे निर्देश देण्यात आले.