प्रतिनिधी / म्हापसा
सर्वेवाडा गिरी येथे कोरन्टाईन केलेले सहा बिगरगोमंतकीय नागरिक गिरी तसेच म्हापसा भागात खुलेआम फिरत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे लेखी निवेदन गिरी येथील नागरिकांनी म्हापसा उपजिल्हाधिकारी अक्षय पोतेकर यांच्या कडे केली आहे. या प्रकरणी यात लक्ष घालणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकाऱयांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गिरी सर्वेवाडा भागात मोठय़ा प्रमाणात बिगरगोमंतकीय असून त्यांचा वावर या भागात दिसून येतो. येथे एका खोलीत सहाजण राहत आहेत. ते या भागात नव्याने आले आहेत. याबाबत आरोग्य खात्याला माहिती दिल्यावर खात्याच्या अधिकाऱयांनी ते राहत असलेल्या सदर ठिकाणी धाव घेऊन त्यांना कोरन्टाईन केले. त्यांच्या हातावर तसा स्टँप मारलेला आहे. असे असतानाही ते या भागात खुलेआम फिरत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
सदर बिगरगोमंतकीय भाजीच्या वाहनातून म्हापशात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांच्यामुळे या भागात भीती निर्माण झाली असून या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या सहाही बिगरगोमंतकीयांना विलगीकरण कक्षात पाठवून द्यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.









