कारपेक्षाही अधिक वजन
बालपणी प्रत्येकाला सायकल चालविणे शिकविले जाते. सायकल संतुलन साधण्यात, रस्त्यावरील नियमांचे पालन करण्याचे प्रारंभिक शिक्षण प्रदान करत असते. याचमुळे सायकल शिकल्यावर कार अन् बाइक चालविणे शिकणे तुलनेत सोपे असल्याचे मानले जाते. परंतु एखादी सायकल ट्रकइतकी मोठी असल्यास ती एखादे लहान मूल चालवू शकणार का? सध्या अशीच एक सायकल चर्चेत आहे. ही सायकल प्रथमदर्शनी तुम्हाला हत्तीसारखी दिसून येईल.

क्लीन जोहाना सध्या अत्यंत लोकप्रिय होत आहे. हे एखाद्या मुलीचे नाव नसून सायकलचे नाव आहे. क्लीन जोहानाला जगातील सर्वात वजनाच्या सायकलचा मान मिळाला आहे. रिकॉर्ड इन्स्टीटय़ूट फॉर जर्मनीने या सायकलला हा पुरस्कार प्रदान केला आहे. ही सायकल स्क्रॅप मेटलने तयार करण्यात आली आहे. 5 मीटर लांब अन् 2 मीटर उंचीची ही सायकल आहे.
सर्वसाधारणपणे हॅचबॅग कार 700 ते 1000 किलोग्रॅम वजनाची असते. परंतु ही सायकल 2,177 किलोग्रॅम वजनाची आहे. ही सायकल अत्यंत वजनी असल्याने ती पॅडलद्वारे कशी चालविता येणार असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. जर्मनीच्या सॅक्सोनी-एनहॉल्ट राज्यात राहणाऱया सिबॅश्चियन ब्यूलटरने ही सायकल तयार केली आहे. त्यांनी या सायकलला ट्रकचा गियर बॉक्स जोडला आहे. या सायकलमध्ये पुढे जाण्यासाठी 35 गियर आहेत, तर मागे जाण्यासाठी 7 गियर आहेत. ही सायकल केवळ एक व्यक्ती पॅडल मारून चालवू शकतो तसेच एकाचवेळी 15 टन वजन वाहून नेऊ शकतो.
3 वर्षांमध्ये सायकलची निर्मिती
ही सायकल तयार करण्यास 3 वर्षांचा कालावधी लागला आहे. सिबॅश्चियनला ही सायकल तयार करण्यासाठी एकूण 2500 तास खर्च करावे लागले आहेत. त्याचे कुटुंब सायकल निर्माण करण्यापासून रोखू पाहत होते. परंतु त्याने हार न मानता सायकल तयार केली आहे. लवकरच या सायकलला जगातील सर्वाधिक वजनाच्या सायकलचा दर्जा प्राप्त होणार असल्याचे मानले जात आहे.









