70 हजार मानवी सांगाडय़ांनी सजावट
जगभरातील अनेक चर्चविषयी वाचले असेल किंवा काहींना प्रत्यक्ष भेटही दिली असेल. पण मानवी सांगाडय़ांनी सजविलेला चर्च पाहिला नसेल. या चर्चला जगातील सर्वात भीतीदायक आणि रहस्यमय चर्च मानले जाते. या चर्चमध्ये एक-दोन हजार नव्हे तर 70 हजार मानवी सांगाडय़ांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. अत्यंत भयभीत करणारे असूनही हा चर्च पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येत पर्यटक तेथे पोहोचतात.
या चर्चचे नाव सेडलेक ऑस्युअरी असून ते चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे आहे. तेथे छतापासून झुंबरापर्यंत सर्वकाही मानवी हाडांनीच तयार करण्यात आले आहे, याचमुळे त्याला चर्च ऑफ बोन्स या नावानेही ओळखले जाते.
या चर्चची निर्मिती आतापासून सुमारे 150 वर्षांपूर्वी म्हणजेच 1870 मध्ये करण्यात आली होती. 1278 मध्ये बोहेमियाचा राजा ओट्टोकर द्वितीयने हेन्री नावाच्या संताला ख्रिश्चनांची पवित्र भूमी जेरूसलेम येथे पाठविले होते. तेथून परतताना हेन्री यांनी स्वतःसोबत पवित्र मातीने भरलेला एक जारही आणला होता. त्यानंतर ती माती एका दफनभूमीवर पसरविण्यात आली. तेव्हापासून लोकांना दफन करण्याचे ते पसंतीचे ठिकाण ठरले. तर 14 व्या शतकात ब्लॅक डेथ महामारी फैलावल्याने मोठय़ा संख्येत लोक मारले गेले, त्यांनाही प्रागच्या त्याच्या दफनभूमीत दफन करण्यात आले.
तर 15 व्या शतकाच्या प्रारंभी बोहेमिया युद्धातही हजारो संख्येत लोक मारले गेले अणि त्यांनाही तेथेच दफन करण्यात आले. मोठय़ा संख्येत लोकांना दफन करण्यात आल्याने कब्रिस्तानात जागाच उरली नाही. याचमुळे त्यांचे सांगाडे आणि हाडांना बाहेर काढून चर्चमध्ये सजविण्यात आले आणि हे चर्च पूर्ण जगात प्रसिद्ध झाले.









