पूर्वी लोक चेष्टा करायचे, आता करतात सलाम
आजही जर माणसाला त्याच्या योग्यतेने नव्हे तर त्याचा रंग-रुप, उंची आणि जात-पातीने ओळखले जात असेल तर त्यात त्याची काहीच चूक नाही. अशा लोकांपर्यंत सत्य आणि प्रेरित करणाऱया गोष्टी पोहोचल्या नाहीत ही चूक आहे. उंची कमी असल्याने अनेक टोमणे ऐकूनही हार न मानणाऱया मुलीची ही गोष्ट आहे. 24 वर्षीय हरविंदर कौर उर्फ रुबी ही सर्वात कमी उंचीची वकील ठरली आहे.
पंजाबमधील आहे ती
पंजाबच्या जालंधर न्यायालयात ती वकील म्हणून कार्यरत आहे. हरविंदर कौर भटिंडानजीकच्या रामा मंडी येथील रहिवासी आहे. हरविंदरची उंची 3 फूट 11 इंच आहे. ती भारतातील सर्वात कमी उंचीची वकील आहे. लहानपणी उंचीवरून तिला टोमणे ऐकावे लागायचे, पण आज हरविंदर लोकांमध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे. लहानपणापासूनच एअर होस्टेस होण्याची इच्छा होती, पण कमी उंचीमुळे हे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याचे ती सांगते.
डॉक्टरांकडे वाऱया
कमी उंचीप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी अनेकदा तिला डॉक्टरांना दाखविले होते. हरविंदरचा शारीरिक विकास मंदगतीचा होता. तिच्यावर अनेक प्रकारचे उपचार देखील झाले. हरविंदरने या सर्व घडामोडींदरम्यान स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले. देवाने जे रंग-रुप दिले आहे ते मान्य करण्याचा निर्धार तिने केला होता.
आत्महत्येचेही विचार

गल्लीपासून शाळेपर्यंत सर्वत्र माझी थट्टा उडविली जायची. एकेकाळी मी लोकांपासून दूर राहायला लागले होते. स्वतःला खोलीत कैद करून घेतले होते. माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचेही विचार आल्याचे हरविंदर सांगते.
प्रेरणादायी वक्ता
महाविद्यालयात जाऊ लागल्यावर माझ्या जीवनात अनेक बदल घडले. हळूहळू सकारात्मक विचार बळावू लागले. 12 वीनंतर कायद्याच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकील झाले आता न्यायाधीश होण्याचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले आहे. हरविंदर आज प्रेरणादायी वक्ता ठरली आहे. इन्स्टाग्रामावर लोक तिला फॉलो करतात.









