प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री या नात्याने सभागृहात सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. गोमंतकीय नागरिकांवर कोणताही कर न लादता मांडलेला हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपाने निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पात केली आहे. वर्षाला तीन घरगुती गॅस सिलिंडर देण्याच्या केलेल्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुमारे 40 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील शेतकऱयांना प्रत्येकी 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याची घोषणा केली आहे.
राज्यातील सुमारे 350 शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच राज्यातील मासेमारी व्यवसायास प्रोत्साहन मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी 10 बायोफ्लोक उभारण्याचीही घोषणा केली आहे. तसेच दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसाठी तब्बल 65 कोटी रुपयांची तरतूद करून मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील सार्वजनिक गाऱहाणी विभाग पुन्हा सुरू करणार ही आहे. तसेच राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱयांचा विमा उतरवला जाणार आहे. तसेच त्यांच्यासाठी स्वेच्छा निवृत्ती योजनाही जाहीर केली आहे. याच बरोबर उत्तर गोव्यात ईएसआय इस्पितळ उभारले जाणार आहे. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 115 इलेक्ट्रकि बसेस घेणार असल्याची घोषणा केली आहे. याच बरोबर पणजी आणि मडगाव येथे पीपीपी तत्वावर अत्याधुनिक बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. यामुळे नोकरदार, राज्यात येणारे पर्यटक आणि प्रवाशांची सोय होईल, असे ते म्हणाले.









