वार्ताहर/ किणये
ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासंबंधात त्यांना लागणाऱया प्राथमिक स्वरुपाच्या सुविधा पुरविण्याकरिता सरकारने ग्रामीण परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करून आरोग्यसेवा देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या लसीसाठी आजही धावपळ करावी लागत आहे. कोरोनाचा पहिला डोस मिळविण्यासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत.
किणये येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रात परिसरातील नागरिक रोज कोरोना लसीसंदर्भात विचारणा करीत आहेत. मात्र, नागरिकांना कोरोना लसीबाबत योग्य ती माहिती देण्यात येत नाही, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. या केंद्रात मुख्य वैद्यकीय अधिकारी कायमस्वरुपी उपलब्ध नसतात, अशाही तक्रार काही जण करीत आहेत.
कोरोना लस देण्यासाठी ग्रामीण भागात राष्ट्रीय पक्षांकडून चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीमार्फत लस गावागावांमध्ये आणण्यात येत आहे. काही अपवाद वगळता केवळ मर्यादित लोकांना लस वितरित केली जात आहे. यामुळे अनेकांना दिवसभर रांगेत उभे राहूनही लसविना घरी परतावे लागत आहे.
आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी ग्रामीण भागातील सर्व जनतेला लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. कोरोनाचा पहिला डोस देण्यात येऊ लागला त्यावेळी ही लस घेतल्यानंतर आपल्या शरीराला काही बाधा होईल की काय? असा विचार करून अनेकांनी लस घेण्याचे टाळले होते. त्यातूनही काही जणांनी पहिला डोस घेतला आहे. काही नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र, खेडय़ापाडय़ांतील सर्वसामान्य जनता अजूनही पहिल्या डोसच्या प्रतीक्षेतच आहे.









