नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
मागच्या काही दिवसांपासून देशात महागाईचा भडका उसळला आहे. पेट्रोल डिजेल तसेच कडधान्य, खाद्य तेलांच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला जगायचे कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता गृहिणींना काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात सुरू केल्याने आता त्यांच्या किंमतीत ३० रुपयांनी घसरण झाली आहे.
गेल्या वर्षभरात खाद्यतेलांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली होती. तातडीचे व दीर्घकालीन उपाय करून केंद्र सरकार या किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. खाद्यतेलांच्या आयात शुल्कात प्रतिटन ८ हजार रुपयांची कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. त्यात पामतेलाचाही समावेश आहे. या शुल्क कपातीची अधिसूचना केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने जारी केली होती. त्यानुसार क्रूड सोयाबीन तेलाचे आयात शुल्क प्रतिटन २७४६ रुपयांनी, तर क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रतिटन ८३१५ रुपयांनी घटविण्यात आले.
देशात खाद्यतेलापैकी ६० टक्के आयात करण्यात येते तर ४० टक्के उत्पादन स्वदेशातच होते. खाद्यतेलाची आयात वाढविल्याने आता किंमतीमध्ये घसरण झाली आहे. शेंगदाणा तेल प्रतिकिलो १८० रुपयांवरून १५० रुपये झाले आहे. सूर्यफूल तेल प्रतिकिलो १७० रुपयांवरून १४० रुपये, तर सोयाबीन तेल प्रतिकिलो १६० रुपयांवरून १३० रुपये व पामतेल प्रतिकिलो १५५ रुपयांवरून १२५ रुपये झाले आहे.
Previous Articleपंजाबमधील कोरोना : सध्या 5,641 रुग्णांवर उपचार सुरु
Next Article बेंगळूरमध्ये भाजपच्या माजी नगरसेविकेची हत्या









