हेळगाव येथील युवकाच्या प्रयत्नांना यश
मसूर / प्रतिनिधी :
कोरोनाच्या महामारीमध्ये अत्यवस्थ असणार्या रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. सध्या ही एक मोठी समस्या निर्माण झाली असून, यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. यावर काहीतरी उपाय योजना आपण करावी या उदात्त भावनेतून कोरोना रुग्णांना उपयोगी ठरेल, असे मिनी व्हेंटिलेटर मशीन विकसित करण्यात पुण्यात कामानिमित्त असणार्या हेळगावच्या युवकाला यश मिळाले आहे.
कराड तालुक्यातील हेळगाव येथील युवा उद्योजक सुनील बाबर यांनी निखिल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर मशीन तयार केले आहे. त्यांनी बनवलेल्या मिनी व्हेंटिलेटरला आता चांगलीच मागणी वाढू लागली आहे. जास्तीत-जास्त व्हेंटिलेटर मिशन बनवून कोरोनाच्या महामारीत व्यवसायाच्या माध्यमातून अल्पदरात सर्वसामान्यांना आणि छोट्या-मोठ्या दवाखान्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
अत्यवस्थ अवस्थेतील कोरोना रुग्णांना जीवदान देऊ शकेल, असे हे मिनी व्हेंटिलेटर मशीन आहे. सध्या अनेक रुग्णांना वेळेवर व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध होत नसल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. परदेशी बनावटीच्या व्हेंटिलेटरच्या किंमतीही भरमसाट आहेत. मात्र, पुण्यात निखिल इंजीनियरिंग आणि यशका इनकोट्रॉनिक्स या दोन कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णपणे भारतीय बनावटीचे मिनी व्हेंटिलेटर तयार करण्यात आले आहे. परदेशी कंपनीपेक्षा या व्हेंटिलेटरची किंमत ही अतिशय कमी आहे.
या मिनी व्हेंटिलेटर मशीनचे सर्व मेकॅनिकल व बॉडी तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम निखिल इंजिनिअरिंग यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स जोडणी यशका इन्फोट्रान्किक्स यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मशीनला महाराष्ट्रासह परराज्यातून मागणी वाढत असल्याचे निखिल इंजिनीरिंगचे प्रमुख सुनील बाबर यांनी दैनिक तरुण भारतला सांगितले.
गेल्या मार्चमध्ये भारतात कोरोनाची सुरुवात झाली. त्यावेळेपासून आज अखेर संपूर्ण देशात व्हेंटिलेटर मशीनची कमतरता जाणवू लागली आहे. या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने निखिल इंजिनिअरिंगचे सुनील बाबर व यशका इन्फो ट्रॉनिक्स यांनी संयुक्तपणे हा प्रयोग हाती घेतला होता. त्यानंतर सहा महिन्यातच त्यांच्या प्रयत्नांना यश आले. भारतीय बनावटीचे व कमी किमतीचे मिनी वेंटिलेटर मशीन बनवण्यात ते यशस्वी झाले. सुरुवातीला चाचणी घेऊन पुण्यातच विविध हॉस्पिटल्सना मशीनचा पुरवठा करण्यात आला. कमी किमतीत आधुनिकतेची जोड असणारे मिनी वेंटिलेटर मशीन रुग्णांना खूपच फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आल्याने या मशीनला मागणी वाढली आहे. तसेच करुणा महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक जणांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद पडलेले असताना निखिल इंजिनिअरिंग आणि यशका इनकोट्रॉनिक्स या दोन कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना काम उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्याबद्दल ही या दोन्ही कंपन्यांच्या कामाचे कौतुक होताना दिसत आहे.









