प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर आगारातील निलंबित केलेल्या पाच एसटी कर्मचाऱयांनी पंचगंगा नदीघाटावर जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शाहुपुरी पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शुक्रवारी सकाळी पावणेअकरा वाजता आंदोलनस्थळावरून त्या पाच कर्मचाऱयांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. साधारण दोन तास त्यांना पोलीस ठाण्यात ठेवले. त्यांचे समुपदेशन केले. तसेच कायदा हातात न घेण्याचे आवाहन करून त्यांना सोडून दिले. शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी ही सर्व परिस्थिती हाताळली. दरम्यान, आमची लढाई ही एसटी प्रशासन, पोलीस प्रशासनाशी नसून राज्य सरकारशी आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची एसटीसेवा मोडकळीस आणण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याची भीती कर्मचाऱयांनी यावेळी व्यक्त केली.
गेल्या बारा दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्य सरकारने याची गंभीरतेने दखल घेतली नसल्याने शुक्रवारी पाच निलंबित कर्मचारी पंचगंगा नदीघाटावर 11 वाजता जलसमाधी घेणार हेते. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना अटकाव करत पोलीस व्हॅनमधून शाहुपुरी पेलीस ठाण्यात बंदेबस्तात आणले. त्यांच्यासमवेत इतर दहा ते बारा जणांनाही ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनस्थळी काहिसा गोंधळ झाला. कर्मचाऱयांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका महिला कर्मचाऱयाला चक्करही आली.
बारा दिवसांपासून राज्य शासनाने एसटीच्या एक लाख कर्मचाऱयांना वेठीस धरले आहे. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये उद्रेक निर्माण झाल्याची भावना कर्मचाऱयांनी व्यक्त केली.
सरकारने तारीख जाहीर करावी...
`एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण करता येतं, पण तूर्त करता येत नाही’ या खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा अर्थ काय समजायचा, असा प्रश्न संपकरी कर्मचाऱयांनी व्यक्त केला. म्हणजे एसटीचे विलीनकरण होऊ शकते. त्यामुळे सरकारने तारीख जाहीर करावी आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्या, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
...आणि बसआगारात एकच गोंधळ
सकाळी सव्वाअकराच्या दरम्यान, अचानक मुंबई-पुण्याला जाणाऱया शिवशाही बस फलाटावरून एक शिवशाही आगाराबाहेर जात असल्याचे आंदोलक कर्मचाऱयांच्या निदर्शनास आल्यानंतर तिथे एकच गोंधळ निर्माण झाला. संपकरी कर्मचाऱयांनी त्या गाडीस बाहेर जाण्यास मज्जाव केला. अखेर ती शिवशाही गाडी आगारात लावली. अधिक माहिती घेतली असता त्या गाडीचे पाठिमागचे चाक पंक्चर झाले होते. पंक्चर काढण्यासाठी संबंधित चालक बस आगाराबाहेर नेत होता.