वार्ताहर/ थिवी
कोणत्याही गावचा विकास घडविण्यास त्या गावात एकोपा असला पाहिजे आणि हेच आमच्या गोव्यात सगळीकडे दिसून येत आहे. गोव्यात हिंदू व ख्रिश्चन धर्माचे लोक एकोप्याने राहतात म्हणून गोव्यात शांतता आहे व यासाठी गोवा हा शांततेचा प्रदेश म्हणून संपूर्ण भारत देशात समानता पावलेला आहे, असे उद्गार आयुष मंत्री तथा राज्य सुरक्षा मंत्री श्रीपाद नाईक यांनी अस्नोडा पंचायत क्षेत्रात खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या अवर लेडी ऑफ हेल्थ चॅपलच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन केल्यानंतर झालेल्या बैठकीत काढले.
व्यासपीठावर आयुष मंत्री श्रीपाद नाईक, कोलवाळचे जिल्हा पंचायत सदस्य गोविंद कुबल, उत्तर गोवा जिल्हा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर, सरपंचा सपना मापारी, पंच सदस्य मेघशाम चोडणकर, प्रवीण बुगडे, शंकर नाईक, उदय मापारी, रोशनाली कवळेकर, छाया बिचोलकर, सलोनी पेडणेकर, चॅपलचे अध्यक्ष सांतान फर्नांडिस, कंत्राटदार संग्राम केरकर, अभियंता लक्ष्मीकांत गडकरी उपस्थित होते.
आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, गोव्यात जी शांतता व एकोपा आहे हा सांभाळण्याचे काम प्रत्येक गोवेकराने केले पाहिजे. राजकारण म्हटल्यानंतर त्यात वाईट बरी माणसे येतातच पण जर राजकारणात चांगली व सुशिक्षित माणसे आली तर देशात शांतता टिकून राहील व देशात जे जाती धर्माच्या नावावर राजकारण करतात ते बंद होईल व यातूनच देशाचा विकास होईल. जे राजकारणी राजकारणासाठी संधी पाहतात अशांना ओळखून त्यापासून आपला देश वाचविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्या वाटय़ाला जी राजकीय कारकीर्द आली त्यांचा आपण देशाच्या व गोव्याच्या हितासाठी सुद्धा खूप फायदा करून घेतला आहे. आपण आपल्या कारकीर्दीत अनेक छोटे मोठे प्रकल्प उभारले ते देशाच्या हितासाठीच व यानंतरही जे प्रकल्प उभारणार किंवा ज्यांची मागणी आहे त्याप्रमाणे लोकहितांसाठी ते प्रकल्प उभारणार. हे प्रकल्प उभारताना आपण कधीच जाती धर्माचा विचार केला नाही.
आज संपूर्ण भारतात जो भारतीय नागरिकत्वाचा कायदा लागू करण्यात येत आहे तो कुणाच्याच हिताआड नसून कुठल्याच भारतीय नागरिकांची तो मग कुठल्याही जाती धर्माचा असो त्याचे नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही त्यासाठी कुणीही घाबरून जाऊ नये. आज देशात जे जाळपोळ करतात व सरकारच्या मालमत्तेचे नुकसान करतात अशा लोकांना साथ देऊ नका व अफवाना बळी पडून देशाचे नुकसान करून घेऊ नये. खासदार निधीतून बांधण्यात आलेला प्रकल्प सुमारे 18 ते 19 लाख रुपये खर्चून बांधण्यात आला आहे व हा प्रकल्प उभारताना आपण कसलाच भेद-भाव केला नाही. अशा प्रकारचे समाजाला उपयोगी असलेले प्रकल्प आपण हाती घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
सरपंच सपना मापारी यांनी स्वागत केले व हा प्रकल्प उभारण्यास आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. अवर लेडी ऑफ हेल्थ चॅपलचे अध्यक्ष सांतान फर्नांडिस यांनी सरपंच सपना मापारी व खासदार श्रीपाद नाईक यांच्या प्रयत्नाने सदर प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जि. पं. सदस्य गोविंद कुबल यांनी खासदार श्रीपाद नाईक व सरपंच सपना मापारी यांच्या कामाबद्दल त्यांची प्रशंसा केली. सूत्रसंचालन श्रीमती रोजी डिकॉस्टा यांनी तर आभार सांतान फर्नांडिस यांनी मानले.









