वृत्तसंस्था/ सिडनी
2020 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या पहिल्या एटीपी चषक सांघिक पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाने कॅनडाचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. तर बेल्जियम आणि स्पेन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत एकेरीच्या सामन्यात बेल्जियमच्या गोफीनने स्पेनच्या टॉप सीडेड नादालला पराभवाचा धक्का दिला.
सर्बिया आणि कॅनडा यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत शुक्रवारी एकेरीच्या सामन्यात सर्बियाच्या द्वितीय मानांकित जोकोव्हिकने कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हचा 4-6, 6-1, 7-6 (7-4) असा पराभव करत आपल्या संघाला उपांत्यफेरीत नेले. जोकोव्हिकचा कॅनडाच्या 20 वषीय शेपोव्हॅलोव्हवरील हा पाचवा विजय आहे. दुसऱया एकेरी सामन्यात सर्बियाच्या लेजोव्हिकने कॅनडाच्या ऍलिसीमेवर 6-4, 6-2 अशी मात केली. आता या स्पर्धेत सर्बिया आणि रशिया यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होईल.
बेल्जियम आणि स्पेन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत शुक्रवारी एकेरीच्या सामन्यात धक्कादायक निकाल पाहावयास मिळाला. बेल्जियमच्या गोफीनने स्पेनच्या टॉप सीडेड नादालचा 6-4, 7-6 (7-3) असा पराभव करत या स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात स्पेनच्या बॉटिस्टाने बेल्जियमच्या कॉपजेन्सचा 6-1, 6-4 असा पराभव करत स्पेनला बरोबरी साधून दिली आहे. आता शनिवारी निर्णायक दुहेरीचा सामना खेळविला जाईल.









